मनोरंजनमुंबई

Film Shooting: मानखुर्दमध्ये १४ एकर जमीन; चित्रनगरीच्या आऊटडोअर शूटिंगचा प्रश्न मिटला

मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या बाह्य चित्रिकरणासाठी ( आऊटडोअर शूटिंग) मानखुर्द येथील सुमारे १४ एकर शासकीय जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे यामुळे चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणासाठी आणखी जागा उपलब्ध होणार आहे.

मौजे मानखुर्द, कुर्ला तालुक्यातील सर्व्हे क्रमांक १३८ मधील तसेच लगतच्या मिळकतीतील सुमारे ५६ हजार ६६६ चौ.मी. जमीन बाह्य चित्रिकरणासाठी देण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल जमीन संहिता, १९६६ मधील कलम ४० अंतर्गत ही जमीन महसूलमुक्त आणि भोगाधिकार मूल्यरहित किमतीने सांस्कृतिक कार्य विभागाला देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटसृष्टीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले.

चित्रिकरणासाठी तब्बल १४ एकर जागा उपलब्ध झाल्याने दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विस्ताराला नवी दिशा मिळणार आहे. आता आऊटडोअर शूटिंग साठी मुंबईतच मोठी जागा उपलब्ध झाल्याने चित्रपट आणि दूरचित्रवाणी निर्मितीला गती मिळण्यासाठी मदत होणार आहे.

Related Articles

Back to top button