मुंबई

माहिममधील चाळीत आठ फुटांचा अजगर; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू

सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे अजगराला जीवदान; वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडले

मुंबई : माहिम परिसरातील एका चाळीत तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळल्याने रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. चाळीच्या परिसरात अचानक अजगर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितपणे पकडण्यासाठी रेस्क्यू मोहीम हाती घेतली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या अजगराला पकडण्यात यश आले.

सर्पमित्र कौशिक केणी, रुशिकेश आणि ऋषित सावंत यांनी ही मोहीम राबवली. अजगराचा आकार आणि त्याची हालचाल लक्षात घेता त्याला पकडताना विशेष खबरदारी घेण्यात आली. कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेत सर्पमित्रांनी कौशल्याने त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे संभाव्य धोका टळला आणि नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

अजगराला पकडल्यानंतर सर्पमित्रांनी तत्काळ वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनविभागाला कळवून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात वन्यजीव आढळण्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. अशा वेळी नागरिकांनी घाबरून न जाता किंवा स्वतः अजगराला पकडण्याचा प्रयत्न न करता सर्पमित्र अथवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. माहिममधील या घटनेत सर्पमित्रांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अजगराचे प्राण वाचले आणि संभाव्य दुर्घटनाही टळली.

Related Articles

Back to top button