Veterinary Students : पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; इंटर्नशिप भत्ता ११ हजारांवरून थेट १८ हजार रुपये…
मुंबई : पशुवैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एक वर्षाची इंटर्नशिप करताना मिळणारा मासिक भत्ता आता ११ हजारांऐवजी १८ हजार रुपये मिळणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या भत्त्यात दरमहा सात हजार रुपयांची वाढ झाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या भत्तेवाढीला मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल. या निर्णयाबद्दल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आभार मानले.
१८ हजार रुपये कसे मिळणार?
पशुवैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना एक वर्ष सरकारी पशुचिकित्सालयांमध्ये प्रत्यक्ष काम करणे बंधनकारक आहे. या काळात त्यांना पशुधनावर उपचार करणे, जनावरांच्या आजारांची माहिती घेणे आणि पशुपालकांना सेवा देण्याचा अनुभव मिळतो. मात्र, निवास, जेवण आणि प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी मिळणारा ११ हजार रुपयांचा भत्ता अपुरा पडत असल्याची बाब लक्षात घेऊन ही वाढ करण्यात आली आहे.
नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना दरमहा १८ हजार रुपये मिळतील. यापैकी १५ हजार रुपये राज्य सरकार देणार असून उर्वरित तीन हजार रुपये भारतीय कृषी संशोधन परिषद आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून दिले जातील. संशोधन परिषदेकडून सहा महिन्यांसाठीच निधी मिळत असल्याने उर्वरित सहा महिन्यांचा तीन हजार रुपयांचा हिस्सा विद्यापीठाला स्वतःच्या निधीतून द्यावा लागणार आहे.
ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयांना मिळणार मदत
या निर्णयामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच आर्थिक आधार मिळणार नाही, तर ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांनाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना ग्रामीण आणि दुर्गम भागातील पशुचिकित्सालयांमध्ये काम करावे लागते. त्यामुळे जनावरांवरील उपचारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याबरोबरच पशुपालकांच्या अडचणीही जवळून समजतात.
भत्त्यात वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना कमी करावा लागेल. तसेच ग्रामीण भागात काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल. भविष्यात प्रशिक्षित पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
पशुधनाचे आरोग्य, जनावरांवरील वेळेवर उपचार आणि पशुपालकांना मिळणारी वैद्यकीय मदत यासाठी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या काळात योग्य आर्थिक मदत मिळाल्यास त्याचा फायदा भविष्यात पशुपालकांनाही होऊ शकतो, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.



