मुंबई

OBC Reservation : सरकारी नोकऱ्यांमधील ओबीसींचा अनुशेष शोधणार; बावनकुळेंचे अधिकाऱ्यांना निर्देश…

मुंबई : राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसी समाजाला किती जागा मिळाल्या आणि किती जागा रिक्त आहेत, याचा नेमका हिशेब आता सरकार घेणार आहे. सरकारी विभागांमधील ओबीसींच्या अनुशेषाची सविस्तर माहिती गोळा करण्याचे निर्देश महसूलमंत्री आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मंत्री छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांनी बैठकीत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने ही माहिती नव्याने तपासण्याची भूमिका घेतली आहे.

मंत्रालयात बुधवारी झालेल्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदांचा विषय चर्चेत आला. अर्थ व सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात सरकारी विभागांमधील मंजूर ७ लाख ३५ हजार ५७३ पदांपैकी ५ लाख १० हजार ८२४ पदे भरलेली आहेत. तर तब्बल २ लाख २४ हजार ७४९ पदे रिक्त आहेत. मात्र, या रिक्त जागांपैकी ओबीसी समाजाचा नेमका किती अनुशेष आहे, याची स्पष्ट आकडेवारी उपलब्ध करून घेण्याची मागणी भुजबळ आणि नाईक यांनी केली. त्यानुसार बावनकुळे यांनी संबंधित विभागांना माहिती गोळा करण्यास सांगितले.

OBC विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांचा प्रश्न मार्गी लागणार

ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरांमध्ये राहण्याची अडचण होऊ नये, यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारण्याची तयारी सुरू आहे. या वसतिगृहांसाठी आणि महाज्योतीच्या कार्यालयांसाठी महसूल विभागाकडून केवळ एक रुपया नाममात्र दराने जागा दिली जात आहे. आतापर्यंत २२ जिल्ह्यांमध्ये जागा निश्चित झाल्या असून उर्वरित १४ जिल्ह्यांतील जागांचा प्रश्न महिनाभरात सोडवला जाणार आहे.

वसतिगृहांची उभारणी चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी सहा वास्तुविशारदांची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यात एकत्रित संकुल उभारण्याचा प्रस्तावही आहे. तर मुंबईतील गोरेगाव-आरे परिसरातील दुग्ध विकास विभागाच्या न्यूझीलंड वसतिगृहातील ८० खोल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. या जागेवर सुमारे १५० विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते.

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दीनिमित्त २१ उपक्रम

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्यभरात २१ वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. यासाठी विविध सरकारी विभागांना जबाबदारी दिली जाणार आहे. राज्यातील दुष्काळ निवारणाच्या काही योजनांना महात्मा फुले यांचे नाव देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजावे, यासाठी सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रमात त्यांच्या जीवनकार्याचा समावेश करण्याबाबत शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

१८ पगड जाती आणि भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवरही चर्चा

ओबीसी, भटक्या-विमुक्त आणि बहुजन समाजाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यावरही बैठकीत चर्चा झाली. लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलेल्या कॅम्पबाहेरील जागांच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन तो सोडवण्याबाबत भूमिका मांडली. तसेच १८ पगड जाती आणि व्हीजेएनटी प्रवर्गातील ४३ समाजांकडून येणाऱ्या निवेदनांवर उपसमिती दर आठवड्याला निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध महामंडळांवरील नियुक्त्या, त्यांना निधी उपलब्ध करून देणे आणि समाजाच्या इतर मागण्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले. बैठकीला मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक, अतुल सावे आणि संजय राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button