राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये, चार ठिकाणी अपर जिल्हाधिकारीही

मुंबई : राज्यातील नागरिकांना महसुली सेवा अधिक जवळ आणि लवकर मिळाव्यात, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येत असून, चार जिल्ह्यांत नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयेही स्थापन केली जाणार आहेत. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.
शासकीय कार्यालयांवरील कामकाजाचा वाढता ताण, अपुरा अधिकारी-कर्मचारी वर्ग, तालुक्यांतील भौगोलिक अंतर, वाढती लोकसंख्या आणि नागरीकरण या बाबी लक्षात घेऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे महसूल विभागाने म्हटले आहे. नवीन कार्यालयांमुळे तहसील व जिल्हा स्तरावरील विविध महसुली सेवा नागरिकांना त्यांच्या जवळ उपलब्ध होतील.
चार जिल्ह्यांत अपर जिल्हाधिकारी कार्यालये
प्रशासकीय विकेंद्रीकरणासाठी पुणे जिल्ह्यातील बारामती, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
२१ जिल्ह्यांत ४७ अपर तहसीलदार कार्यालये
गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, आरमोरी, धानोरा, सिरोंचा, एटापल्ली व अहेरी तालुक्यातील अनुक्रमे मालेवाडा, वैरागड, पेंढरी, आसरअल्ली, कसनसूर व जिमलगट्टा येथे नवीन कार्यालये येणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व सेलू तालुक्यातील अल्लीपूर व सिंदी (रेल्वे), नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण), हिंगणा, नागपूर (शहर), कामठी, काटोल, नरखेड, मौदा व कुही तालुक्यातील बुटीबोरी, हुडकेश्वर, वानाडोंगरी, पारडी, वडोदा, कोंढाळी, जलालखेडा, कोदामेंढी व वेलतूर येथेही कार्यालये सुरू होणार आहेत.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व खामगाव तालुक्यातील साखरखेर्डा व लाखनवाडा, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड तालुक्यातील शेंबाळ पिंप्री व ढाणकी, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, मुखेड व किनवट तालुक्यातील तामसा, मुक्रमाबाद व इस्लापूर, लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील मुरुड बुद्रुक, परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणा, जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील नेर, बीड जिल्ह्यातील बीड व आष्टी तालुक्यातील नेकनूर व कडा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले व नेवासा तालुक्यातील राजूर व घोडेगाव, नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नामपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे, सातारा जिल्ह्यातील फलटण व कऱ्हाड तालुक्यातील साखरवाडी व उंब्रज, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण, पालघर जिल्ह्यातील डहाणू, वसई व पालघर तालुक्यातील कासा, विरार व बोईसर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला, बोरीवली व अंधेरी तालुक्यातील चेंबूर, मालाड व वांद्रे येथेही नवीन अपर तहसीलदार कार्यालये येणार आहेत.
या निर्णयामुळे विशेषतः गडचिरोलीसारख्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना विविध दाखले, जमिनीचे फेरफार, संजय गांधी निराधार योजना आणि इतर शासकीय सेवा अधिक वेळेत व जवळ मिळू शकतील.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राज्यातील तळागाळातील, ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवा सुलभ आणि जलद मिळाव्यात, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. प्रशासन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्यासाठीच राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये आणि चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.”



