Lalbaug Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या!’ २४ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे अखेर विसर्जन

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यभर लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून गणरायाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने गजबजलेली मुंबई विसर्जन मिरवणुकांनी दुमदुमून गेली. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला.
मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळपासूनच विविध मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झाल्या होत्या. आपल्या लाडक्या बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी बाप्पाला निरोप देताना भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईचा उत्साहही पाहायला मिळाला.
लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप
मुंबईची शान आणि नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या लालबागच्या राजाचे आज भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. काल दुपारी १२ वाजता लालबागच्या राजाची मंडपातून विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली.या मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते. लालबागच्या राजाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मुंबईच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना
गेल्या दहा दिवसांत मुंबईसह देशभरातून भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. गणेशोत्सवाच्या काळात विविध गणेश मंडळांकडून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होत असताना भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाकडे सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना केली. विसर्जनानंतर आता भक्तांना पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा लागली आहे.‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.



