लालबाग ते गिरगाव चौपाटी… राजाच्या विसर्जनाची जय्यत तयारी

राजा तेजुकायाचीही सकाळी ६.४५ वाजता मिरवणूक; दोन्ही मंडळांकडून वेळापत्रक जाहीर
मुंबई,: अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी सुरू झाली असून, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपल्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मिरवणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. उत्तर पूजेनंतर दुपारी १२ वाजता राजेशाही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
दुपारी १ वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक मुख्य प्रवेशद्वारातून पुढे मार्गस्थ होणार आहे. यावेळी मुंबई पोलिसांना विशेष सलामी देण्यात येणार आहे. ‘माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणून उत्सव साजरा होतोय गर्दीतला’ या भावनेतून पोलिसांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे.
लालबाग मार्केटपासून सुरू होणारी ही मिरवणूक मुख्य प्रवेशद्वार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारतमाता सिनेमा, लालबाग पोलिस चौकी, लालबाग मुख्य प्रवेशद्वार, श्रॉफ बिल्डिंग, चिंचपोकळी ब्रिज, भायखळा रेल्वे स्टेशन, हिंदुस्तान मस्जिद, मुंबई अग्निशमन दल मुख्यालय, खडा पारसी, दोन टाकी, कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधव बाग, व्ही. पी. रोड, प्रार्थना समाज, गिरगाव चौपाटी सिग्नल आणि मुंबई महापालिका स्वागत कक्ष मार्गे गिरगाव चौपाटीवर पोहोचणार आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयाजवळ लालबागच्या राजाला सायरन वाजवून सलामी देण्यात येणार आहे. तसेच दोन टाकी परिसरात मुस्लिम बांधवांकडून लालबागच्या राजाला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. विविध ठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे. त्यानंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरील विसर्जन तराफ्यावर पोहोचेल.
२६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरील तराफ्यावरून लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अरबी समुद्राच्या दिशेने सुरू होणार आहे.
राजा तेजुकायाची मिरवणूक सकाळी ६.४५ वाजता
दरम्यान, राजा तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही विसर्जन मिरवणुकीचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. २५ सप्टेंबर रोजी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे ४ वाजता उत्तर पूजा करण्यात येणार असून, त्यानंतर सकाळी ६.४५ वाजता राजा तेजुकायाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.
सकाळी ७ ते ७.३० या वेळेत नाक्यावर प्रवेश कार्यक्रम होईल. त्यानंतर तेजुकाया मेन गेट, भारतमाता सिनेमा सिग्नल, गणेश गल्ली गेट, प्रतिप स्टोअर, हॉटेल मस्त गावरण, शॉप बिल्डिंग पुष्पवृष्टी आणि आनंद निवास या मार्गावरून मिरवणूक पुढे जाईल. आनंद निवास येथे सकाळी ११.३० ते १२ या वेळेत आरती करण्यात येणार आहे.
दुपारी १२ वाजता राजा तेजुकायाची विसर्जन मिरवणूक पुढील मार्गाने गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होईल :
चिंचपोकळी ब्रिज → साने गुरुजी मार्ग → आर्थर रोड → बकरी अड्डा → सातरस्ता → आगरीपाडा → डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (लॅमिंग्टन रोड) → ऑपेरा हाऊस → गिरगाव चौपाटी.
दोन्ही गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित मंडळांनी नागरिक आणि भक्तांनी वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मिरवणुका शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.



