मुंबई

लालबागच्या राजाच्या दागिन्यांच्या लिलावातून ३ कोटी २२ लाखांची कमाई

मुंबई : लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह विविध वस्तूंचा लिलाव बुधवारी करण्यात आला. या लिलावात एकूण ८५ वस्तूंची विक्री झाली असून, त्यातून तब्बल ३ कोटी २२ लाख २८ हजार रुपये जमा झाले. ही माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. भाविकांकडून राजाच्या चरणी सोने-चांदीचे दागिने, विविध मौल्यवान वस्तू तसेच इतर साहित्य अर्पण केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान केले. त्यातील निवडक वस्तूंचा लिलाव बुधवारी करण्यात आला.

या लिलावातील एक किलो वजनाची सोन्याची वीट विशेष आकर्षण ठरली. या सोन्याच्या विटेची १ कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांना विक्री झाली. लिलावातील ही सर्वाधिक किमतीची वस्तू ठरली.

लिलावात सोन्या-चांदीच्या विविध दागिन्यांसह मोदक, चांदीच्या गदा, क्रिकेट बॅट तसेच दोन मोटारसायकलींचाही समावेश होता. या सर्व वस्तूंच्या विक्रीतून ३ कोटी २२ लाख २८ हजार रुपयांचा निधी जमा झाला.

दरम्यान, लालबागच्या राजाच्या दानपेटीतही भाविकांकडून मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे दान करण्यात आले आहे. लिलाव तसेच दानातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग मंडळातर्फे विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी केला जातो.

Related Articles

Back to top button