लालबागच्या राजा गिरगाव चौपाटी वर विसर्जनासाठी दाखल. विसर्जनासाठी लागणार काही तासांचा विलंब लागणार?

निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखो भाविकांचा जनसागर
मुंबई : लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईत जनसागर लोटला असून, लालबागच्या राजाची मिरवणूक २२ तासांनंतर गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. सर्वांचे लक्ष प्रत्यक्ष विसर्जन सोहळ्याकडे लागले आहे. मात्र, भरती, समुद्रातील लाटांचा प्रभाव, भव्य मूर्तीचे वजन आणि तांत्रिक बाबी लक्षात घेता लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी काही तासांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
लालबागच्या राजाची मूर्ती भव्य आणि वजनाने जड असल्याने विसर्जनाची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडली जाते. यासाठी अत्याधुनिक यांत्रिक तराफ्याचा वापर केला जातो. समुद्रातील लाटांचा वेग, भरतीची स्थिती आणि तराफ्यावर मूर्ती सुरक्षितपणे स्थिर करण्याची प्रक्रिया यामुळे विसर्जनाला वेळ लागू शकतो.
दरम्यान, गिरगाव चौपाटीवर लाखो भाविकांची गर्दी झाली असून, पोलिस प्रशासन आणि मंडळाचे कार्यकर्ते सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. योग्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांतही समुद्रातील परिस्थिती आणि तांत्रिक अडचणींमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला मोठा विलंब झाल्याचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे यंदाही भाविकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.



