मुंबई

लालबागच्या राजाच्या ‘VIP संस्कृती’ला मुंबईच्या डबेवाल्यांचा तीव्र विरोध; सामान्य भाविकांच्या हक्कासाठी सुभाष तळेकर आक्रमक

मुंबई: मुंबईचा ‘राजा’ म्हणून ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनावरून पुन्हा एकदा व्हीआयपी (VIP) विरुद्ध सामान्य भाविक असा वाद उफाळून आला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुरू असलेल्या VIP संस्कृतीला मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी जाहीर आणि कडक शब्दांत विरोध दर्शवला आहे. बाप्पाच्या दरबारात सर्वांना समान वागणूक मिळायला हवी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

सामान्य भाविकांची ससेहोलपट आणि भेदभावाचा आरोप

एका बाजूला सामान्य कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले पाया पडण्याच्या दर्शनासाठी (चरणस्पर्श) तब्बल १२ ते १५ तास उपाशीपोटी रांगेत उभे राहतात. मात्र, प्रत्यक्ष बाप्पाच्या चरणाजवळ पोहोचल्यावर सुरक्षारक्षक त्यांना अवघ्या ५ सेकंदांत ढकलून बाहेर काढतात.

दुसऱ्या बाजूला राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींना मात्र विशेष वागणूक दिली जाते. कोणत्याही रांगेत उभे न राहता त्यांना बाप्पाच्या चरणाशी निवांत बसून दर्शन घेऊ दिले जाते. योगदानावर प्रश्नचिन्ह: “या अभिनेत्यांचे आणि श्रीमंतांचे देश किंवा समाजासाठी नक्की काय योगदान आहे की त्यांना देवळातही विशेष सोय दिली जाते?” असा रोखठोक सवाल तळेकर यांनी विचारला आहे.

धर्मादाय आयुक्तांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

देवासमोर सर्व भाविक समान असतात, त्यामुळे बाप्पाच्या दरबारात हा दुजाभाव पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे तळेकर यांनी म्हटले आहे. या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी (Charity Commissioner) तात्काळ हस्तक्षेप करावा आणि ही VIP दर्शनाची पद्धत बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनातील सुरक्षा रक्षकांची अरेरावी आणि VIP संस्कृतीवरून भाविकांमधून नाराजी व्यक्त होत असते; आता डबेवाल्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे

Related Articles

Back to top button