१४ फुटांवरील बांधकामांवरून ठाकरे गटाचा विरोध; पेडणेकरांचे आयुक्तांना निवेदन

मुंबई : मुंबईतील १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपडपट्टीतील बांधकामांवर महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईवरून ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनधिकृत बांधकामांना आपला विरोध नसला, तरी कोणतीही पूर्वकल्पना किंवा योग्य माहिती न देता अचानक कारवाई करून झोपडपट्टीधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नये, अशी मागणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.
पेडणेकर यांच्यासह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सोमवारी महापालिका आयुक्तांना निवेदन देत या कारवाईबाबत आक्षेप नोंदवला. १४ फुटांपर्यंतच्या बांधकामांना अभय देण्याची मागणी यापूर्वी सुनील प्रभू आणि यशोधर फणसे यांनीही केली असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
“आमचा अनधिकृत बांधकामांना पाठिंबा नाही. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ मतांसाठी किंवा कागदोपत्री पूर्तता न करता कारवाई केली जात असेल, तर त्याला आमचा विरोध आहे,” असे पेडणेकर म्हणाल्या. कलेक्टर, म्हाडा किंवा संबंधित प्राधिकरणाकडून कारवाई सुरू नसताना केवळ महापालिकेमार्फत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
१४ फुटांपर्यंत बांधकाम होत असताना संबंधित अधिकारी काय करत होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. झोपडपट्टीतील मुलांचे शिक्षण आणि कुटुंबांचे स्थैर्य लक्षात घेता नागरिकांना अचानक घरांवर कारवाई करून अस्थिर करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, १४ फुटांनंतर वाढविण्यात आलेल्या बांधकामांमध्ये काही ठिकाणी व्यावसायिक वापर आणि आर्थिक फायदा होत असल्याचे आयुक्तांनी सांगितल्याचा दावा पेडणेकर यांनी केला. अशा प्रकरणांचे सर्वेक्षण करून नियमानुसार कारवाई करण्यास आपला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील मैदानांच्या वापराबाबतही पेडणेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. “मुंबईत मैदान लुटून दिली जात आहेत. मग याचसाठी इतका अट्टहास केला होता का?” असा सवाल त्यांनी केला. या विषयावर सर्व विरोधक एकत्रितपणे आवाज उठवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौरांवरही निशाणा
महापौर रितू तावडे यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना पेडणेकर यांनी, “महापौरांनी आपल्या खुर्चीखाली काय बॉम्ब लागले आहेत ते पाहावे आणि नीट अभ्यास करावा,” अशी उपरोधिक टीका केली. निवडणूक आयोगाबाबत प्रश्न विचारला असताना त्याचे उत्तर निवडणूक आयोगानेच द्यावे, असे सांगत त्यांनी महापौरांवरही निशाणा साधला.
पाणी कपातीवर भूमिका
मुंबईच्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरी १० टक्के पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना उपलब्ध पाणी योग्य दाबाने मिळावे, अशी मागणी पेडणेकर यांनी केली. जुन्या इमारतींमध्ये पाणी योग्य दाबाने पोहोचत नसल्याने महापालिकेने पाणीपुरवठ्याचा दाब कायम ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी बचतीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरही पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली. या प्रक्रियेमुळे झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे त्या म्हणाल्या. नागरिकांच्या हिताचा विचार करूनच विकासाच्या योजना राबवाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली.



