मुंबई

बनावट भारतीय ओळखपत्रांचे रॅकेट? खार पोलिसांच्या कारवाईत ६ बांगलादेशी नागरिक ताब्यात…

मुंबई : खार पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान बनावट भारतीय ओळखपत्रे तयार करून देणारे तसेच बांगलादेशातून भारतात येण्यासाठी मदत करणारे मध्यस्थ आणि इतर संबंधित व्यक्तींचे संभाव्य जाळे पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आले आहे.

खार पोलिसांच्या पथकाने २९ सप्टेंबर २०२६ रोजी ही कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या कागदपत्रांची आणि ओळखीची पडताळणी केली असता, ते बांगलादेशी नागरिक असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

या प्रकरणात इकबाल अकबरअली शेख ऊर्फ गौतम सुनिल दत्ता (३५) याच्याविरुद्ध खार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६४५/२०२६ नोंद करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याने बांगलादेशातून व्यक्तींना भारतात आणण्यासाठी मदत करणे तसेच त्यांच्यासाठी ओळखपत्रे, रेल्वे प्रवास, निवास आणि रोजगाराची व्यवस्था करण्यासंदर्भात मदत केल्याची माहिती समोर आली.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये राणा मोल्ला इमदादुल मोल्ला ऊर्फ राणा शाह (२०), समीम मिझानूर सरदार ऊर्फ राजू नरेंद्र (२५), मोसमद मुंजिला खातून ऊर्फ सिला सरदार ऊर्फ रिया दत्ता (२३), माफुजा अख्तर लिमा मो. हाशम काझी ऊर्फ कविता शाह (२५) आणि हलीमा अख्तर मो. झिल्लू खान ऊर्फ मोनिका दत्ता (२६) यांचा समावेश आहे.

मोबाईलमध्ये ४० संशयित ओळखपत्रांचे फोटो

अटक आरोपीच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता विविध व्यक्तींच्या नावाने असलेल्या सुमारे ४० आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर ओळखपत्रांचे फोटो आढळले. त्यासोबत महिलांचे फोटो, क्यूआर कोड, रेल्वे प्रवासाची तिकिटे आणि अन्य डिजिटल माहितीही पोलिसांना मिळाली.

आरोपीच्या निवासस्थानी घरझडती घेतली असता बांगलादेशातील बांग्लालिंक कंपनीचे एक सिमकार्ड तसेच विविध व्यक्तींच्या नावाने असलेली २० संशयित किंवा बनावट आधारकार्डे सापडली. ही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

जप्त करण्यात आलेली आधारकार्डे खरोखर बनावट आहेत का आणि ती कोणत्या कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आली, याची संबंधित सक्षम प्राधिकरणामार्फत पडताळणी सुरू आहे.

एजंट आणि ओळखपत्र बनविणाऱ्यांचा शोध

या प्रकरणात बनावट भारतीय ओळखपत्रे तयार करून देणाऱ्या व्यक्तींचा, बांगलादेशातून भारतात अवैधरीत्या प्रवेश करण्यासाठी मदत करणाऱ्या मध्यस्थांचा, तसेच प्रवास, निवास आणि रोजगाराची व्यवस्था करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत खार पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button