दिवाळीच्या मुहूर्तावर कामाठीपुरा समूह पुनर्विकास
मुंबई: दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत बांधकाम आणि विकास (C&DA) पद्धतीने राबविण्यात येणार हा प्रकल्प भगीरथी हाऊसिंग प्रा. लि. आणि माथी डेव्हलपर्स यांच्यासोबत करार करण्यात आला. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
कामाठीपुरा येथे ३४ एकर क्षेत्रात, गल्ली क्रमांक १ ते १५ मध्ये प्रस्तावित असलेल्या ह्या प्रकल्पात सुमारे ४७५ उपकरप्राप्त आणि २५९ बिगर-उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ बिगरनिवासी भाडेकरू, तसेच सुमारे ८०० जमीनमालक या
प्रकल्पाशी संबंधित आहेत. या भागातील भूखंड आकाराने लहान व अरुंद असल्यामुळे स्वतंत्र इमारतींच्या पुनर्विकासाऐवजी समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे. म्हाडा मुख्यालयात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आणि विकासक कंपनीचे संचालक अतुल गोयल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
म्हाडाला लॉटरीसाठी ९०० घरे मिळणार
कामाठीपुरा समूह पुनर्विकासातून म्हाडासाठी सुमारे ४४,००० चौ.मी. गृहसाठा उपलब्ध होणार असून, यामधून सुमारे ९०० अतिरिक्त घरांची निर्मिती प्रस्तावित आहे.
रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यमान पात्र रहिवासी व भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्यात येणार असून पात्र भाडेकरूंना ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकांची तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक गाळेधारकांच्या
पुनर्वसनाचा यात समावेश आहे.
प्रकल्पूर्ण होईपर्यंत मिळणार भाडे
बिगरनिवासी गाळेधारकांसाठी क्षेत्रफळानुसार वाढीव भाड्याची तरतूद करण्यात आली आहे. २०० चौ.फू. पर्यंत २५,००० रुपये, २०० ते ४०० चौ.फू. क्षेत्रासाठी ३०,००० रुपये आणि ४०० चौ.फू. पेक्षा अधिक क्षेत्रासाठी ३५,००० रुपये प्रतिमाह भाडे देण्यास मान्यत देण्यात आली आहे.



