काळाचौकीत गणेशोत्सव मंडळाच्या पाण्याच्या स्टॉलला विजेचा धक्का; दोन महिलांचा मृत्यू, चार जखमी

मुंबई : काळाचौकी येथे गणेश भक्ताना वाटप करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर विजेचा धक्का लागून दोन महिलांचा मृत्यू झाला.तीन जण जखमी असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.मृतांमध्ये आठ वर्षीय मुलीचा समावेश.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर रविवारी पहाटे विजेचा धक्का लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यापैकी दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एका १२ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर असून तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही घटना २० सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २.४२ वाजता घडली. दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळील तात्पुरत्या पाण्याच्या स्टॉलमध्ये विद्युत प्रवाह जाणवत असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळाली.
माहिती मिळताच वीजपुरवठा बंद करण्यात आला आणि खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसर सील करण्यात आला. त्यानंतर बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिग्विजय मिल चाळ, दत्ताराम लाड मार्ग येथील घटनास्थळी पाहणी केली. संबंधित वीजखांब क्रमांक DLM-14 असून गणपती उत्सवातील रोषणाई आणि शीतपेय स्टॉलसाठी लावण्यात आलेल्या तात्पुरत्या मीटर क्रमांक M217392 ची तपासणी करण्यात आली.
स्थानिक वीजतंत्रज्ञाने तात्पुरत्या मीटरची वायरिंग आणि एमसीबी आधीच तोडल्याचे बेस्टच्या पाहणीत समोर आले. घटनास्थळी वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला असून बेस्टचा फ्यूजमनही उपस्थित होता. काळाचौकी पोलिसांनी मीटर निरीक्षकांना घटनास्थळी पाहणीसाठी बोलावले . या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.
मृत आणि जखमींची नावे
मसिना रुग्णालयात :
- राघिनी घनश्याम यादव, ८ वर्षे — मृत घोषित
- किरण अकबर नाईक, १९ वर्षे — प्रकृती स्थिर
- तन्वी नरेश हांडे, १९ वर्षे — प्रकृती स्थिर
- साहिल संदीप तारे, १९ वर्षे — प्रकृती स्थिर
ग्लोबल रुग्णालयात : - सुजाता, ३३ वर्षे — मृत घोषित
- रुही सिंग, १२ वर्षे — प्रकृती गंभीर; आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू.
विजेचा धक्का नेमका कशामुळे लागला आणि तात्पुरत्या वीजजोडणीमध्ये कोणती त्रुटी होती, याबाबत पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.



