पवई आयआयटीत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

मुंबई : मुंबई आयआयटीमध्ये बी.टेक.च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याचा शुक्रवारी संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. प्रशासनाने हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.दोन दिवस आय आय टी परिसरात शोकाकुल आणि तणावपूर्ण वातावरण होते.
आयआयटी प्रशासनाच्या माहितीनुसार, साहिल परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना आढळला होता. त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याने तो अस्वस्थ होता. परीक्षा संपल्यानंतर तो हॉस्टेलमध्ये परतला. त्यानंतर सायंकाळी तो त्याच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच कॅम्पसमधील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. काही वेळातच मोठ्या संख्येने विद्यार्थी कॅम्पसमध्ये एकत्र आले आणि त्यांनी निदर्शने सुरू केली. प्रशासन विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत उदासीन असल्याचा आरोप करत साहिलच्या मृत्यूची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. ‘साहिलला न्याय द्या’, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, साहिलच्या वडिलांनी पवई पोलिसांकडे तक्रार दाखल करत आपल्या मुलाचा छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. “माझ्या मुलाचा नाहक बळी घेण्यात आला. हे कृत्य करणाऱ्याला कडक शासन झालेच पाहिजे. आम्हाला न्याय द्या,” अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी संबंधितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पवई पोलीस करत आहेत.



