ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲपचे लोकार्पण
मुंबई : ज्ञानेश्वरी आपल्याला जगाकडे पाहण्याची दृष्टी आणि जीवन समजून घेण्याचे ज्ञान देते. काळाचा संदर्भ बदलला, परिस्थिती बदलली तरी या ज्ञानाचे मूळ स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेली संस्कृती टिकून राहते. त्यामुळे ज्ञानेश्वरी काल, आज आणि उद्याही दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. प्रत्येकाने ज्ञानेश्वरीतील किमान एका ओवीचा तरी अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त व्हॅल्युएबल ग्रुप प्रस्तुत आणि मेराक इव्हेंट्स आयोजित ‘ज्ञानरंग : माऊलींच्या ओव्यांचा उत्सव’ हा कार्यक्रम शुक्रवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ या विशेष मोबाइल ॲपचे लोकार्पण करण्यात आले.
डॉ. भागवत म्हणाले की, जगाचे जीवन शाश्वत आहे. जगाकडे कसे पाहावे आणि जीवन कसे समजून घ्यावे, याचे ज्ञान भारतीय परंपरेतून मिळते. हे ज्ञान सर्वत्र एकच आहे. प्रत्येक कालखंडात महापुरुषांनी आपल्या काळाच्या संदर्भात त्याची मांडणी केली. काळ आणि परिस्थिती बदलली तरी ज्ञानाचे मूळ स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेली संस्कृती कायम राहिली आहे.
परकीय आक्रमणांच्या काळात भागवत भक्तीच्या आधारावर भारतीय समाज टिकून राहिला आणि अधिक वृद्धिंगत झाला. हे ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आज जगाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी भारताची आहे. ज्ञानेश्वरी हा भारताच्या ज्ञानपरंपरेतील अमूल्य ठेवा असून तो नव्या पिढीपर्यंत तसेच जगभरातील जिज्ञासूंपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा ज्ञानठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ‘ज्ञानरंग : ज्ञानेश्वरी’ ॲप साकारण्यात आले आहे. भक्ती, ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम या उपक्रमातून साधण्यात आला आहे. या ॲपद्वारे माऊलींच्या ओव्या रोजच्या जीवनात ऐकता, वाचता आणि समजून घेता येणार आहेत. ओवी ऐकतानाच तिचे शब्दागणिक वाचनही करता येणार आहे.
हे ॲप शुक्रवारपासून Google Play Store आणि Apple App Store वर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध झाले आहे. या ॲपची संकल्पना व्हॅल्युएबल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमेय हेटे यांची आहे.
‘संपूर्ण ज्ञानेश्वरी श्रवण’ मालिकेचा शुभारंभ
याच सोहळ्यात डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांसह ‘संपूर्ण ज्ञानेश्वरी श्रवण’ या मालिकेचा YouTube वर शुभारंभ करण्यात आला. आजच्या धावपळीच्या जीवनात ज्यांना ज्ञानेश्वरीचे वाचन करणे शक्य होत नाही, त्यांना ती सहजपणे ऐकता यावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या उपक्रमाची संकल्पना तसेच ज्ञानेश्वरीचे वाचन रेणुका देशकर यांनी केले असून, श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन श्रीनिवास वर्णेकर यांनी केले आहे.
लोकार्पण सोहळ्यापूर्वी माऊली ज्ञानेश्वरांच्या अलौकिक रचनांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि केतकी चैतन्य यांनी संत ज्ञानेश्वरांच्या विविध ओव्या आणि संगीत रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी माऊलींच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण निरूपण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.



