मुंबई

Gyanesh Kumar Resignation Demand; CJP चे 2 ऑक्टोबरला जेलभरो आंदोलन.

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP) 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत जेलभरो आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.सदर आंदोलनासाठी पक्षाने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी शिवाजी पार्क येथे आंदोलनास परवानगी नाकारली आहे. त्यानंतरही आंदोलनाचा निर्णय कायम असल्याचे CJPचे संस्थापक अभिजीत दीपके एक्स’वरून जाहीर केले आहे.

दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यापूर्वीही त्यांनी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतून आंदोलनाला सुरुवात करून ते देशातील इतर शहरांमध्ये नेण्याची भूमिका CJPने जाहीर केली होती.

2 ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी शिवाजी पार्कची जागा मागण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारताना न्यायालयीन निर्देश, स्थानिक प्रशासनाची आवश्यक परवानगी नसणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता यांचा उल्लेख केला आहे. आयोजकांना आंदोलनासाठी अन्य जागेचा विचार करण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.

परवानगी नाकारल्यानंतरही CJPने आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरला मुंबईत या आंदोलनाचे स्वरूप काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा महामोर्चा

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत संयुक्त महामोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चात विविध पक्षांच्या नेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चाचे ठिकाण आणि वेळ नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोबरचे CJPचे आंदोलन आणि त्यानंतर 4 ऑक्टोबरला होणारा ठाकरे बंधूंचा महामोर्चा यामुळे मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Related Articles

Back to top button