गोरेगाव-मुलुंड जुळ्या बोगद्यांच्या कामाला वेग

‘तुळशी’ TBMने ६४ मीटर खोदकाम; ‘विहार’ची जोडणी ९२ टक्के पूर्ण
मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील भूमिगत जुळ्या बोगद्यांच्या कामाला वेग आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली ‘तुळशी’ या टनेल बोरिंग मशीनद्वारे (TBM) आतापर्यंत ६४ मीटर बोगदा खोदण्यात आला असून, या अंतरात २७ कंकणाकृती कडे उभारण्यात आले आहेत. दरम्यान, दुसऱ्या ‘विहार’ TBMची जोडणी ९२ टक्के पूर्ण झाली आहे.
गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगरदरम्यान जुळ्या भूमिगत बोगद्यांची उभारणी करण्यात येत आहे. प्रत्येकी तीन मार्गिका असलेल्या या बोगद्यांची लांबी सुमारे ५.३० किलोमीटर असून, प्रकल्पातील बोगद्यांचा महत्त्वाचा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली आहे.
‘तुळशी’ TBM १७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले. या यंत्राद्वारे बोगदा खोदण्याचे काम सुरू असून, खोदकामासोबतच बोगद्याच्या आतील कंकणाकृती कड्यांची उभारणीही केली जात आहे. आतापर्यंत ६४ मीटर खोदकाम पूर्ण झाले असून २७ कायमस्वरूपी कडे आणि दोन तात्पुरत्या कड्यांची उभारणी करण्यात आली आहे.
दरम्यान, ‘विहार’ TBMचे सुटे भाग जोडण्याचे काम ९२ टक्के पूर्ण झाले आहे. संपूर्ण यंत्रणा बसवल्यानंतर १३ ऑक्टोबरपासून साइट अॅक्सेप्टन्स टेस्ट (SAT) घेण्यात येणार आहे. तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून दुसऱ्या बोगद्याचे प्रत्यक्ष खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.
फेब्रुवारी २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळाची पाहणी करून बोगदा खोदकामाची पद्धत, यंत्रसामग्री, सुरक्षा व्यवस्था, बांधकामाचा दर्जा आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग कायम ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बोगदा प्रकल्पाच्या कामकाजासाठी स्वतंत्र ‘डॅशबोर्ड’ तयार करण्याचे निर्देशही बांगर यांनी दिले. या डॅशबोर्डवर कामाची टक्केवारी, बोगदा खोदकामाची प्रगती, दररोजचे खोदकाम, अपेक्षित पूर्णता, सुरक्षा आणि वेळापत्रक यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बोगदा खोदकामाचे काम तांत्रिक आणि आव्हानात्मक असल्याने कामाच्या वेगासोबतच कामगार व अभियंत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील हा महत्त्वाकांक्षी भूमिगत बोगदा प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.



