गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी उड्डाणपूल अंतिम टप्प्यात

१५ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन; ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भार चाचणी
मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पातील गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यानच्या १.२६ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे मुख्य बांधकाम १०० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी गुरुवारी प्रकल्पस्थळाची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भार चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी सज्ज केला जाणार आहे.
दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात आलेल्या या ३ बाय ३ मार्गिकेच्या उड्डाणपुलावर एकूण ३१ खांब आणि ३० स्पॅन आहेत. रत्नागिरी जंक्शन येथील हॉटेलजवळ हा पूल वळून चित्रनगरी परिसरात उतरतो. पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीट सेगमेंटल बॉक्स गर्डरच्या साहाय्याने एका स्तंभावर या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.
पुलावरील तुळई बसविणे, डेक स्लॅबचे ओतकाम तसेच दोन्ही बाजूंच्या पोहोच मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या रंगरंगोटी, दिशादर्शक फलक, विद्युत खांब, थर्मोप्लास्टिक मार्किंग, कॅट्स आय आणि ध्वनीरोधक बसविण्याची कामे सुरू आहेत. पुलालगतच्या ७.५ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्यांचे कामही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुलाखालील रस्त्यांवरील अडथळे तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करावी, तसेच परिसरातील राडारोडा व घनकचऱ्याची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवावा, असे निर्देश बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले. पुलावरील तसेच परिसरातील वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्या GMLR प्रकल्पामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या मार्गामुळे दोन्ही उपनगरांदरम्यानचा प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटांपर्यंत कमी होण्याचा महापालिकेचा अंदाज आहे. त्यामुळे इंधनाची बचत आणि वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणात घट होण्यास मदत होणार आहे.
पाहणीवेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) नरेश मेघराजानी यांच्यासह महापालिकेचे अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.



