अनंत चतुर्दशीसाठी गिरगाव चौपाटी सज्ज, परदेशी पाहुण्यांसाठीही विशेष दालन

प्रभाकर शिंदेंकडून विसर्जन व्यवस्थेचा आढावा; लहान-मोठ्या मूर्तींसाठीची तयारी आणि कृत्रिम तलावांची पाहणी
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जनासाठी करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांचा स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आज आढावा घेतला.
गिरगाव चौपाटीवर लहान तसेच मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांची शिंदे यांनी पाहणी केली. विसर्जनाच्या दिवशी भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तयारीची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी परदेशी पर्यटक तसेच विविध देशांच्या दूतावासांच्या राजदूतांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष दालनाचीही शिंदे यांनी पाहणी केली. तसेच महापालिकेच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची माहिती घेतली.
गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यात विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक गिरगाव चौपाटीवर येणार असल्याने महापालिकेने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी स्थानिक नगरसेवक गौरांग झवेरी, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाठ, डी विभागाचे अभियंता रावसाहेब सांगोलकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.



