CCTV, ड्रोन, हॅम रेडिओ अन् विविध यंत्रणा एकाच छताखाली; गिरगाव चौपाटीवर आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष

अनंत चतुर्दशीला लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी महापालिका सज्ज; सीसीटीव्ही, ड्रोनसह विविध यंत्रणांचा तात्काळ समन्वय.
मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त २५ सप्टेंबर रोजी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने सर्वंकष तयारी केली आहे. लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यंदा प्रथमच गिरगाव चौपाटीवर व्यापक स्वरूपाचा ‘आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष’ (Emergency Management Control Room) कार्यरत करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत विविध यंत्रणांमध्ये तातडीने समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी हा कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव आणि सहायक आयुक्त (डी विभाग) संतोष साळुंके यांच्या समन्वयाने हा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षामध्ये महापालिका मुख्यालयाच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बेस्ट, मुंबई पोलिस, मुंबई अग्निशमन दल, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) तसेच अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे हॅम चालक समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत.
आपत्कालीन संदेशवहन आणि समन्वयासाठी नियंत्रण कक्षात भ्रमणध्वनी, डिजिटल मोबाइल रेडिओ (बिनतारी यंत्रणा) तसेच हॅम रेडिओ यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी डी विभागाकडून विशेष स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. दुर्घटनेची माहिती तातडीने मिळावी यासाठी परिसरात दोन ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, प्रथमोपचार केंद्रे, रुग्णवाहिका, सुरक्षा व गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मूर्ती विसर्जनासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळही तैनात करण्यात आले आहे.
विसर्जनादरम्यान मंडपाला आग लागणे, एखादी व्यक्ती समुद्रात बुडणे किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी डी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २४ सप्टेंबर रोजी विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
गिरगाव चौपाटीवरील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामार्फत मुंबई अग्निशमन दल, पोलिस, आरोग्य विभाग, किनारी सुरक्षा यंत्रणा आणि अन्य संबंधित विभागांशी तात्काळ समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. या माध्यमातून अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविकांची सुरक्षितता आणि विसर्जन सोहळ्याचे सुरळीत व्यवस्थापन करण्यावर महापालिकेचा भर आहे.



