मुंबई

गणेश मंडपांत योजनांची माहिती, नागरिकांना थेट मार्गदर्शन

मुंबई : गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेत माहिती व जनसंपर्क विभागाने मुंबई उपनगरात ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रम सुरू केला आहे. गणेश मंडपांना भेट देणाऱ्या नागरिकांना आता फक्त दर्शनच नव्हे, तर शासनाच्या विविध योजनांची माहितीही एकाच ठिकाणी मिळत आहे. यामुळे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शास्त्रीनगर गणेशोत्सव मंडळ

मंडपांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना योजनांची संपूर्ण माहिती देत आहेत. पात्रता काय, अर्ज कुठे आणि कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, संबंधित कार्यालय कुठे आहे आणि लाभ कसा मिळतो, याबाबत थेट मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे योजना आणि नागरिक यांच्यातील माहितीची दरी कमी होण्यास मदत होत आहे.

शासकीय वसाहत वांद्रे

युवक, विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध योजनांचीही माहिती दिली जात आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींबाबत मार्गदर्शन करून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे.

या उपक्रमात समाजकल्याण, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि महसूल विभागानेही सहभाग घेतला आहे. विभागीय संपर्क अधिकारी ब्रिजकिशोर झंवर आणि संजय ओरके यांनी विविध मंडळांना भेटी देत समन्वय केला. ग्राम महसूल अधिकारी घोषिता गोसावी, समाजकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी नंदना गजभिये, तालुका समन्वयक आनंदा कांबळे, समतादूत सिद्धार्थ शिरसाट आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जिल्हा समन्वयक परेश अपंडकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबवला जात आहे.

इंदिरानगरचा राजा – महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (आशापुरा, वांद्रे पूर्व), शास्त्रीनगरचा राजा – शास्त्रीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (शास्त्रीनगर, वांद्रे पूर्व) आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ (शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व) या मंडळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही सक्रिय सहकार्य केले.

गणेशोत्सवातील भक्तीच्या वातावरणात लोककल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवण्याचा हा प्रयत्न प्रभावी ठरत आहे.

Related Articles

Back to top button