फिल्मसिटीच्या मैदानाला GMLRच्या कामाचा फटका; १७४ कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या कामासाठी फिल्मसिटीतील जोश मैदान, जोकर मैदानासह काही जागांचा वापर करण्यात आल्याने चित्रिकरणासाठी मैदाने उपलब्ध राहिलेली नाहीत. त्यामुळे चित्रनगरी महामंडळाने मुंबई महापालिकेकडे तब्बल १७४ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. मात्र, महापालिकेने प्रत्यक्ष ताब्यात घेतलेल्या जमिनीचा विचार करून २० कोटी ८ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
GMLRच्या कामासाठी फिल्मसिटी परिसरातील काही मैदाने आणि जमीनपट्ट्यांचा वापर करण्यात येत आहे. या जागांवर चित्रिकरण करता येत नसल्याने चित्रनगरी महामंडळाच्या महसुलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महामंडळाने या कालावधीतील नुकसानभरपाई म्हणून १७४ कोटी रुपयांची मागणी महापालिकेकडे केली आहे.
महापालिकेच्या प्रस्तावानुसार, प्रकल्पाच्या कामासाठी प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनीचा विचार करून नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. सुमारे १,६०० मीटर लांब आणि १० मीटर रुंद जमीनपट्ट्यासाठी वार्षिक ५१.३० लाख रुपये भुईभाडे आकारण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार संबंधित कालावधीचा विचार करून महापालिकेने २० कोटी ८ लाख रुपयांची रक्कम देण्याचे प्रस्तावित केले आहे.
चित्रनगरी महामंडळाची मागणी आणि महापालिकेने निश्चित केलेली रक्कम यामध्ये मोठी तफावत असल्याने हा विषय स्थायी समितीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत प्रस्तावावर निर्णय घेतला जाणार आहे.



