मुंबई

५ कोटींच्या कर्जाच्या बहाण्याने चित्रपट निर्मात्याची १० लाखांची फसवणूक; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

योगेश सी पटेल

मुंबई: चित्रपट निर्मितीसाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने अंधेरीतील एका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्याची १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर फायनान्स कंपनीची जाहिरात देऊन पैसे उकळणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला परिसरात राहणारे चित्रपट निर्माते हेमंतकुमार महाले (६९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कौशिक लाठिया आणि लॅविन परयानी यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवला आहे.

इन्स्टाग्राम जाहिरातीतून संपर्क

तक्रारीनुसार, महाले यांना एका चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैशांची गरज असल्याने ते कर्जाच्या शोधात होते. नोव्हेंबर २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर त्यांची नजर एका खाजगी फायनान्स कंपनीच्या जाहिरातीवर पडली, ज्यामध्ये तातडीने खाजगी कर्ज देण्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता त्यांची बातचीत कौशिक लाठिया याच्याशी झाली.

अशी केली फसवणूक

दोन दिवसांनंतर झूम (Zoom) मीटिंगद्वारे झालेल्या चर्चेत लाठियाने ५ कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली. यासाठी वार्षिक १० टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आणि व्याजासह संपूर्ण रक्कम (५ कोटी ५० लाख रुपये) वर्षाच्या शेवटी एकरकमी परतफेड करण्याचे ठरले. मात्र, प्रक्रिया शुल्क म्हणून १ टक्का ई-नोंदणी (E-registration), १ टक्का मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि ३ हजार रुपये वकिलाची फी भरण्यास सांगण्यात आले.

ठरल्याप्रमाणे महाले यांनी आरटीजीएसद्वारे (RTGS) १० लाख रुपये लॅविन याच्या बँक खात्यात वर्ग केले, तर ३ हजार रुपये गुगल-पे द्वारे पाठवले. मात्र पैसे हातात पडताच लाठियाने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांतच फोन उचलणे पूर्णपणे बंद केले.

अहमदाबादच्या नागरिकाचीही अशीच फसवणूक

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महाले यांनी या संदर्भातील एक व्हिडीओ तयार करून यूट्यूबवर अपलोड केला. तो व्हिडीओ पाहून अहमदाबादमधील एका नागरिकाने महाले यांच्याशी संपर्क साधून आपलीही याच पद्धतीने फसवणूक झाल्याचे सांगितले. त्या व्यक्तीकडून महाले यांना लॅविनचा थेट संपर्क क्रमांक मिळाला. लॅविनशी संपर्क साधला असता त्याने दावा केला की, कमिशनचे १ लाख रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित ९.०३ लाख रुपये त्याने लाठियाच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. सुरुवातीला १ लाख रुपये परत करण्याचे कबूल करणाऱ्या लॅविननेही नंतर संपर्क तोडला. अखेर फसवणूक स्पष्ट झाल्याने महाले यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related Articles

Back to top button