Supreme Court | तुकाराम मुंढेंच्या FDAला सुप्रीम कोर्टाचा ‘बूस्टर’; भेसळखोरांची धडकी वाढली!

प्रशांत गोडसे
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यातील वडगाव शेरी येथील गुरुनानक डेअरी अँड स्वीट्सवरील FDAची कारवाई योग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने डेअरीला पाच लाख रुपयांचे नुकसानभरपाईचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
अन्न विषबाधेच्या तक्रारीनंतर कारवाई
गुरुनानक डेअरी अँड स्वीट्समध्ये अन्न विषबाधेची तक्रार आल्यानंतर १२ जून रोजी FDAच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. यावेळी डेअरीमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे, अभिलेख व्यवस्थित न ठेवणे तसेच खाद्यपदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर FDAने डेअरीचा परवाना निलंबित केला होता.
या कारवाईविरोधात संबंधित व्यावसायिकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने १७ ऑगस्ट रोजी परवाना निलंबनाचा आदेश उठवला. तसेच FDAच्या कारवाईमुळे व्यावसायिकाचे नुकसान झाल्याचे नमूद करत FDA ने पाच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे निर्देश दिले होते.
FDAची सुप्रीम कोर्टात धाव
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला FDAने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने FDAची कारवाई योग्य ठरवत उच्च न्यायालयाचा नुकसानभरपाईचा आदेश रद्द केला. त्यामुळे या प्रकरणात FDAला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंढेंच्या कारवायांची राज्यभर चर्चा
तुकाराम मुंढे यांनी FDAची सूत्रे हाती घेतल्यानंतर भेसळखोर आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईला वेग आला आहे. राज्यातील विविध भागांत तपासण्या आणि कारवाया सुरू असून, या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये धास्ती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मुंढे यांच्या कामाची परदेशातही दखल घेतली जात असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने त्यांच्या कामाची दखल घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील अधिकारी FDAच्या कार्यालयात मुंढे यांची भेट घेण्यासाठी आले होते.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे FDAच्या कारवाईला बळ मिळाले असून, भेसळखोर आणि नियम मोडणाऱ्यांसाठी हा निर्णय थेट इशारा मानला जात आहे..



