मुंबई

सणउत्सवात अन्न व औषध प्रशासनाचा दणका; राज्यातील ३१ हॉटेल-खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, क्लब, बेकरी आणि अन्य खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ३१ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. यामध्ये मुंबई विभागातील १२, कोकण विभागातील १२, पुणे विभागातील सहा आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील एका परवान्याचा समावेश आहे.

तपासणीदरम्यान अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, अन्नाची अयोग्य साठवणूक व हाताळणी, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदींचा अभाव तसेच अन्न सुरक्षेशी संबंधित अनिवार्य नोंदी न ठेवणे, अशा प्रकारचे उल्लंघन आढळून आले.

मुंबई विभागात खार येथील अन्नदाता आहार केंद्र, माझगाव येथील न्यू इंग्लिश बेकरी, सेंट फिलोमेना बेकरी, ब्लिंक कॉमर्सची दोन केंद्रे, बोरिवली येथील राधाकृष्ण ईटरी आणि विविध कॅन्टीन आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. वैध परवाना नसतानाही खाद्यपदार्थांचे उत्पादन होत असल्याचे आढळलेल्या एका आस्थापनाचा परवाना निलंबित करून ते तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तेथून १.१७ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

या मोहिमेत निकृष्ट दर्जाचे, असुरक्षित किंवा चुकीची माहिती असलेले संशयित खाद्यपदार्थ आणि ६१७ लिटर दूध जप्त करण्यात आले. जप्त मालाची एकूण किंमत १६.२२ लाख रुपये असल्याचे एफडीएने सांगितले. पुण्यात अमूल ब्रँडच्या नावाने कथितरीत्या विकले जाणारे ४३० किलो चीज, कोल्हापुरात १८.२० किलो सुटे पनीर आणि अहिल्यानगरमध्ये सुमारे ५.२७ लाख रुपये किमतीची २,३९८ किलो स्किम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आली.

याशिवाय सांगलीत ३४ किलो तूप व ११९ किलो गायीच्या दुधाची क्रीम, पुण्यात ४२३ किलो बदाम तसेच मिठाई, नमकीन, खाद्यतेले, सुटे काजू, ओवा, खवा आणि मुरमुरे आदी खाद्यपदार्थही जप्त करण्यात आले.

गुटख्याविरोधातही कारवाई

एफडीएच्या पथकांनी राज्यातील १८ ठिकाणी कारवाई करून ६१.१७ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणांत १८ जणांना अटक करण्यात आली असून १३ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी तपासणी आणि कारवाईची मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button