डे केअर सेंटरच्या फ्रीजरमध्ये वृद्धाचा मृतदेह

मुंबई : मालाडच्या कुरार परिसरातील एका डे केअर सेंटर-क्लिनिकच्या फ्रीजरमध्ये वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रताप वराजदास उद्देशी या वृद्धाचा २०२२ मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह तब्बल चार वर्षे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
कुरारमधील कोंकणी पाडा परिसरात हे डे केअर सेंटर-क्लिनिक असल्याची माहिती आहे. या ठिकाणी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यामागील कारण काय होते आणि या प्रकरणाची माहिती संबंधितांच्या निदर्शनास का आली नाही, याचा तपास केला जात आहे. मृत्यू झाल्यानंतर चार वर्षे मृतदेह जतन करून ठेवण्यात आल्याच्या माहितीमुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
पोलिसांकडून डे केअर सेंटरमधील संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असून, मृत्यूच्या परिस्थितीसह मृतदेह इतका काळ फ्रीजरमध्ये ठेवण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. तपासाअंती या प्रकरणातील अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



