ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंचा गौरव; तीन पुरस्कारांनी होणार सन्मान

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील लोककल्याणकारी योजना व प्रशासकीय कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ब्रिटिश संसदेतील ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ आणि ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ येथे ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांत शिंदे यांचा तीन पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी शिंदे बुधवारी लंडनला रवाना झाले.
‘यूके एशियन बिझनेस कौन्सिल’ आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबरला ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा होणार आहे. नागरिककेंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनासाठी शिंदे यांना हा सन्मान देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, नागरिकांना शासकीय सेवा थेट उपलब्ध करून देणे आणि तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे या क्षेत्रांतील कामाची विशेष दखल घेण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या योजनांचा त्यात उल्लेख आहे.
‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’
१० सप्टेंबरला ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६ : ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’चे आयोजन करण्यात आले आहे. इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेस शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांना ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
या परिषदेत शिंदे महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन तसेच भारत-ब्रिटन आर्थिक संबंधांवर मार्गदर्शन करणार आहेत. नगरविकास, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामाची माहिती ते या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडणार आहेत.
या कार्यक्रमांना ब्रिटिश संसदेचे सदस्य, वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत तसेच जागतिक उद्योजक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीला ब्रिटनमध्ये चालना मिळण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व आहे.
महाराष्ट्र मंडळाकडून ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’
लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र भवनालाही शिंदे भेट देणार आहेत. मंडळाच्या वतीने त्यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासातील योगदानाबरोबरच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चीही दखल घेतली गेली .
ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’चे यापूर्वीचे मानकरी
मिळालेल्या माहितीनुसार ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ हा सन्मान यापूर्वी महाराष्ट्र मंडळ, लंडनकडून उद्योग, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आला आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना २०२४ मध्ये उद्योग, शिक्षण, सामाजिक कार्य आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. झी एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत गोयंका यांनाही २०२४ मध्ये ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरविण्यात आले. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला.



