मुंबई

दिवाळीनिमित्त पालिका मुख्यालयात महिला बचत गटांचे प्रदर्शन; आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह अधिकाऱ्यांची खरेदी

article top:

महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन; दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंनाही प्रदर्शनात स्थान

मुंबई : महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दिवाळीनिमित्त विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ४ नोव्हेंबर रोजी आयोजित या प्रदर्शनाला पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महानगरपालिका मुख्यालयाच्या जुन्या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी बचत गटांच्या विविध उत्पादनांची खरेदी करून महिलांचा उत्साह वाढविला.

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे आणि गरजू महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनामुळे बचत गटांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीतून उत्पन्न मिळविण्याची संधी मिळाली.

प्रदर्शनात उटणे, अगरबत्ती, ज्यूट बॅग, इमिटेशन ज्वेलरी, मोत्यांचे दागिने, रांगोळी, सुगंधी द्रव्ये, आकर्षक पणत्या, तोरणे, आकाशकंदील यांसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कलात्मक आणि नाविन्यपूर्ण वस्तूंनाही प्रदर्शनात स्थान देण्यात आले. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले.

केवळ मुख्यालयातच नव्हे, तर महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्येही बचत गटांच्या उत्पादनांचे विक्री स्टॉल उभारण्यात आले होते. त्यामुळे महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले.

Related Articles

Back to top button