मुंबई

Airport ST Service : दादरहून नवी मुंबई विमानतळावर थेट ‘लालपरी’; अटलसेतूमार्गे उद्यापासून सेवा…

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता एसटीची थेट बससेवा सुरू होणार आहे. दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बससेवा ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ही बस अटलसेतूमार्गे विमानतळापर्यंत जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे.

दादर हे मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र आहे. त्यामुळे दादरहून थेट विमानतळासाठी बस सुरू झाल्याने मुंबईतील प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळावा, यासाठी एसटीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

बोरिवली आणि स्वारगेटहूनही बस

दादरसोबतच बोरिवली ते नवी मुंबई विमानतळ आणि स्वारगेट ते नवी मुंबई विमानतळ या मार्गांवरही एसटी बससेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्याकडून विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांना थेट बसचा पर्याय मिळणार आहे.

नवी मुंबई विमानतळाला मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागांशी जोडण्यासाठी एसटीच्या बससेवेचा उपयोग होणार आहे. विमानप्रवासी, नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना या सेवेचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

विमानतळ कनेक्टिव्हिटीला बळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीत मोठा बदल होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळापर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर एसटीचा भर आहे. भविष्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन आणखी मार्गांवर बससेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

दादर, बोरिवली आणि स्वारगेटहून थेट बस सुरू झाल्यावर नवी मुंबई विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोपा होणार आहे. मुंबईच्या ‘लालपरी’मुळे विमानतळाची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Back to top button