कुर्ल्यातील ४७७ झाडांवर कुऱ्हाड,धारावी पुनर्विकास झाडांच्या मुळावर.

पालिकेचा दावा १,६८२ झाडे पुनर्स्थापित करणार.
मुंबई, बहुचर्चित धारावी पुनर्विकास प्रकल्प होऊ घातला आहे.यासाठी कुर्ला पूर्वेतील मदर डेअरीच्या जागेवरील ४७७ झाडे तोडण्याच्या प्रक्रियेला मुंबई महापालिकेने सुरूवात केली आहे. याबाबत पालिकेच्या उद्यान विभागाने जाहिरात प्रसिद्ध केली असून, जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत या प्रस्तावावर हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प खासगी कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. याविरोधात अनेक आंदोलने धरणे आणि निदर्शने सुरू आहेत.धारावीतील पात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करण्यात येणार असून, अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कुर्ला, मुलुंड, मालाड आदी ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुर्ला पूर्व येथील मदर डेअरीची जागा प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे.
या जागेवर पुनर्वसनासाठी इमारती उभारण्यात येणार असल्याने तेथील ४७७ झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. त्याचवेळी १,६८२ झाडे पुनर्स्थापित करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे. प्रस्तावित विकासकामामुळे बाधित होणाऱ्या झाडांची पाहणी करून त्यापैकी कोणती झाडे तोडायची आणि कोणती पुनर्स्थापित करायची, याबाबतची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या प्रस्तावावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचनांवर ७ ऑक्टोबर रोजी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाच्या कार्यालयात सुनावणी होणार आहे.



