Devghar On Rent Marathi Movie :‘देवघर ऑन रेंट’चा थरारक प्रवास; ‘अगं आई गं…’ गाण्यात गौतमी पाटीलचा ठसकेबाज अंदाज

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे आणि नावीन्यपूर्ण विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच मालिकेतील ‘देवघर ऑन रेंट’ हा अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शनचा संगम असलेला चित्रपट आहे. एका रहस्यमय देवघराभोवती घडणाऱ्या घटनांमधून पोलिसांचा पाठलाग, गुन्हेगारी आणि सूडाची कहाणी उलगडणार आहे. या कथेला अध्यात्माची भावनिक किनारही लाभली आहे.या चित्रपटातील ‘अगं आई गं…’हे धमाकेदार गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अस्सल मराठमोळा ठेका आणि आधुनिक संगीताचा सुरेख मेळ या गाण्यात साधण्यात आला आहे. महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिने आपल्या ठसकेबाज अदा आणि लयबद्ध नृत्याने गाण्याची रंगत वाढवली आहे.

लेखक-गीतकार संजय नवगिरे यांनी हे गाणे लिहिले असून संगीतकार कबीर शाक्य यांनी संगीत दिले आहे. पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे यांच्या दमदार आवाजाने गाण्याला विशेष रंगत मिळाली आहे. गाण्याचे नृत्यदिग्दर्शन किशोर दळवी यांनी केले आहे.आनंदी पिक्चर्स अमरावती प्रस्तुत आणि राधाकृष्ण प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन रोडे पाटील आणि पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. दिग्दर्शन स्वरूप सावंत यांचे असून चित्रपटाची संकल्पना पूनम चौधरी पाटील यांची आहे. कथा, पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत.
चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चवरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर आणि सिद्धेश्वर झाडबुके यांच्या भूमिका आहेत. ‘केजीएफ’फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.‘देवघर ऑन रेंट’ हा चित्रपट २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदोर आणि बडोदा येथे प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे रहस्य, ॲक्शन आणि मनोरंजनाचा हा अनोखा मेळ प्रेक्षकांना कितपत भावतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.



