दहिसरमध्ये शाळेच्या आवारात १४ फूटांचा खड्डा

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) — दहिसर पश्चिम येथील तरे मार्ग, मुंबई पब्लिक स्कूलच्या आवारात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्यासाठी तब्बल १४ फूट खोल खड्डा खोदण्यात आल्याचा मुद्दा आज शिक्षण समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. शाळेची पूर्वपरवानगी किंवा पूर्वकल्पना न देता हे खोदकाम करण्यात आल्याचा आरोप शिक्षण समिती सदस्य प्रियांक राऊत यांनी केला. त्यामुळे सुमारे २,५०० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आर-उत्तर प्रभागातील या शाळेला लागून, १०० मीटरच्या आत कृत्रिम तलाव उभारण्यात आला. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर आधीच विसर्जनासाठी तलाव उपलब्ध असताना शाळेच्या मैदानाची निवड का करण्यात आली, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
शाळेच्या मैदानाचा वापर विद्यार्थ्यांच्या खेळासाठी केला जात असताना मोठ्या प्रमाणात मैदाने उपलब्ध असलेल्या दहिसर परिसरात याच जागेची निवड का करण्यात आली, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच गणेशोत्सवाच्या १२ दिवसांच्या कालावधीत या कृत्रिम तलावात अवघ्या १०० मूर्तींचे विसर्जन झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना उपायुक्त सपकाळे यांनी, शाळेपासून १०० मीटरच्या आत कृत्रिम तलाव उभारण्यात आला असेल, तर ते चुकीचे असल्याचे सांगितले. या प्रकरणाची माहिती संबंधित सहाय्यक आयुक्तांकडून मागवून त्याबाबत स्पष्टीकरण दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रशासनाकडून स्पष्टीकरण मिळेपर्यंत हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात येत असल्याचे शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी सांगितले.



