मुंबई

दहिसर-भाईंदर जोडरस्त्याच्या कामाला वेग, डिसेंबर २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून मुंबई आणि मिरा-भाईंदर परिसरातील प्रवास अधिक वेगवान व सुरळीत करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. या प्रकल्पातील दहिसर-भाईंदर जोडरस्ता (पॅकेज ७) डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर आंतरबदलाच्या प्रकल्पस्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गती वाढविण्यासह गुणवत्ता आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या.

दहिसर-भाईंदर जोडरस्त्याची एकूण लांबी सुमारे ५.१३५ किलोमीटर असून, त्यामध्ये उन्नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता, खाडीवरील उन्नत संरचना, खारपाण जमीन क्षेत्रावरील उन्नत मार्ग, जोडमार्ग, आंतरबदल तसेच उड्डाणपुलांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम असा थेट आणि जलद रस्ते संपर्क उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पातील सुमारे ३.८३ किलोमीटर लांबीचा आणि ४५ मीटर रुंदीचा मुख्य उन्नत मार्ग हा मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाचा अंतिम भाग आहे. सध्या या मार्गासाठी गॅबियन भिंतीचे कुंपण उभारण्याचे काम सुरू आहे. पुलाच्या पायाभरणीसाठी पाइल्स आणि पाइल कॅप तयार करण्याचे कामही सुरू आहे. आतापर्यंत ६० पाइल्स, ५ पाइल कॅप आणि ४ पिअरची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच पिअर कॅप आणि नऊ सेगमेंटचे काम पूर्ण झाले आहे.

कामासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून, तात्पुरता प्रवेश पूलही कार्यान्वित करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँचिंग गर्डरचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून त्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले. तसेच विविध प्राधिकरणांसह मिरा-भाईंदर महापालिकेचे सहकार्य घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. कामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून सुरक्षाविषयक प्रमाणित कार्यपद्धतीचे (SOP) काटेकोर पालन करावे, तसेच कामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले.

Related Articles

Back to top button