सायबर फसवणुकीच्या पैशांतून महागडे मोबाईल खरेदी; अहमदाबादमधून दोघांना अटक

₹१९.६६ लाखांचे २५ मोबाईल फोन हस्तगत; लो. टि. मार्ग पोलिसांची कारवाई
मुंबई : क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून तब्बल ₹४ लाख ४८ हजार ७२१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा लो. टि. मार्ग पोलिसांनी छडा लावला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कुर्ला आणि अहमदाबाद येथून दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ₹१९ लाख ६६ हजार ७५ रुपयांचे २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
लो. टि. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, आरोपीने तक्रारदाराला फोन करून आपण आरबीएल क्रेडिट कार्डकडून बोलत असल्याचे भासवले. क्रेडिट कार्डवरील मेल ऑर्डर सेवा बंद करण्याच्या नावाखाली आरोपीने तक्रारदाराच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एक लिंक पाठवली.
ही लिंक उघडल्यानंतर तक्रारदाराच्या परवानगीशिवाय क्रेडिट कार्डवरून तीन व्यवहार करण्यात आले. त्याद्वारे स्विगी प्लॅटफॉर्मवर ₹४,४८,७२१ रुपयांची खरेदी करून फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अनिसबेग समिरबेग मिर्झा (२३) आणि मोईन रहिम शेख (३४) यांना अटक केली.
अटक आरोपींकडून या गुन्ह्यातील Apple कंपनीचे दोन मोबाईल फोन, तसेच इतर गुन्ह्यांशी संबंधित Apple, Samsung, Google, Vivo आणि इतर कंपन्यांचे २३ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कारवाई सायबर गुन्हे प्रकटीकरण पथक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.



