Festival Cut : दुष्काळामुळे मोठ्या महोत्सवांना कात्री; २५ कोटी बारव संवर्धनासाठी – शेलार

मुंबई : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने सांस्कृतिक विभागाने यंदा मोठे महोत्सव आणि अनावश्यक खर्चाला लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोठे कार्यक्रम कमी करून स्थानिक लोककलावंतांना अधिकाधिक संधी दिली जाणार आहे. कार्यक्रमांवरील खर्चातून उपलब्ध होणाऱ्या निधीपैकी २५ कोटी रुपये ऐतिहासिक बारवांच्या संवर्धनासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
सांस्कृतिक संचालनालयामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतले जातात. मात्र यंदा केवळ आवश्यक कार्यक्रमच आयोजित केले जातील. काही कार्यक्रम पुढील वर्षी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे उपलब्ध होणारा निधी बारव संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे.
बारवांचे संवर्धन केवळ ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी न करता त्याचा उपयोग पाण्याचे नियोजन आणि जलसंधारणासाठीही व्हावा, अशा सूचना देण्यात आल्याचे शेलार यांनी सांगितले. दुष्काळाच्या काळात शेतकरी, विद्यार्थी, जनावरे तसेच लोककलावंतांना त्याचा फटका बसू नये, यासाठी खर्चाचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते सफाईच्या टँकर खर्चावर म्हणाले…
मुंबईत रस्ते सफाईसाठी टँकरचा वापर केला जात असल्याच्या मुद्द्यावर शेलार यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. मुंबई महापालिका यावर स्पष्टीकरण देईल. मात्र अनावश्यक खर्च होऊ नये. रस्ते सफाई आवश्यकच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
MPSC आंदोलनावर राज ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य
MPSCच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत शेलार म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आणि व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. कोणत्या आंदोलनात सहभागी व्हायचे, हा देखील प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘इगो’मुळे निर्णय घेत नसल्याची टीका केली होती. त्यावर शेलार यांनी थेट नाव न घेता टोला लगावला. ‘अफवांचे पीक घेणारे काही जण प्रदूषण करत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.
INDIA आघाडीच्या मोर्चावरही निशाणा
INDIA आघाडीच्या मोर्चाबाबत शेलार यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधक राजकीय हेतूने मोर्चे काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. मतदारांच्या हितासाठी त्यांची नेमकी भूमिका काय आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे शेलार म्हणाले.
विरोधकांनी किती BLA म्हणजेच बूथ लेव्हल एजंट नियुक्त केले आहेत, हे आधी सांगावे. निवडणूक आयोगाच्या बैठकीला येत नाहीत आणि नंतर प्रश्न उपस्थित करतात. ही भूमिका म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असल्याची टीका त्यांनी केली.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसला सवाल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे शेलार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र आदिवासी विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या कार्यालयात का डांबून ठेवण्यात आले, याचे उत्तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी द्यावे, असा सवाल शेलार यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. ‘स्वतःच्या राजकीय चष्म्याची काच साफ करा,’ असा टोला त्यांनी लगावला.
‘९६ लाख बोगस मतदार’ दाव्यावर सवाल
मतदार यादीतील कथित बोगस मतदारांच्या संख्येवरूनही शेलार यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ऑक्टोबर २०२५ पासून विरोधकांनी केलेली विविध विधाने तपासावीत. आता ९६ लाख बोगस मतदार असल्याचा दावा केला जात असेल, तर त्यांची नेमकी भूमिका काय आहे, हे आधी स्पष्ट करावे, असे शेलार म्हणाले



