मुंबई

राष्ट्रकुल संसदीय परिषदेला भारतातील पीठासीन अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार

मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे १३ ते १९ सप्टेंबरदरम्यान ६९ वी राष्ट्रकुल संसदीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस लोकसभा, राज्यसभा तसेच देशातील विविध राज्यांच्या विधानमंडळांतील पीठासीन अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या ‘राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखे’चे प्रतिनिधित्व विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर आणि विधानसभा सदस्या नमिता मुंदडा करणार आहेत.

राष्ट्रकुल संसदीय परिषदेत संसदीय लोकशाही व्यवस्था असलेल्या विविध देशांमधील वैचारिक आदान-प्रदान, परस्पर सहकार्य आणि संसदीय व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा व परिसंवाद आयोजित केले जातात.

यंदाच्या परिषदेत १० वी कॉमनवेल्थ वुमन पार्लमेंटॅरिअन कॉन्फरन्स तसेच युथ राऊंडटेबल कॉन्फरन्स देखील होणार आहे.

‘बदलत्या जागतिक व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय कायदा आणि संसदीय लोकशाहीचे सक्षमीकरण : राष्ट्रकुलाचे नेतृत्व’ ही परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्याअंतर्गत विविध देशांमधील अर्थव्यवस्थांमध्ये न्याय्य व सर्वसमावेशक व्यापारपद्धती निर्माण करण्यासाठी आंतरसंसदीय संवाद, दिव्यांग व्यक्तींच्या सहभागासाठी संसद अधिक सुलभ करणे, हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संसदीय नेतृत्वाची भूमिका आदी विषयांवर विचारमंथन होणार आहे.

तसेच संसदेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, कायदा मंजूर झाल्यानंतरची छाननी, संसद आणि जनतेमधील प्रभावी संवाद, मानवी हक्कांचे संरक्षण आणि शांततेला प्रोत्साहन देण्यात संसदेची भूमिका यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरही परिषदेत चर्चा होणार आहे.

या परिषदेमुळे विविध देशांतील संसदीय प्रतिनिधींना अनुभवांची देवाणघेवाण तसेच संसदीय लोकशाही अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी परस्पर सहकार्याची संधी मिळणार आहे.

Related Articles

Back to top button