चुनाभट्टी उड्डाणपुलाच्या आराखड्याची फेरतपासणी

मुंबई : चुनाभट्टी रेल्वे फाटकामुळे वारंवार होणारा लोकलचा खोळंबा आणि परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वीच महापालिकेने आराखड्याची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेला १८.७० लाख रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे.
चुनाभट्टी रेल्वे फाटक दिवसाला सुमारे ३० ते ३५ वेळा उघड-बंद होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याबरोबरच लोकलच्या वेळापत्रकातही खोळंबा निर्माण होतो. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महापालिकेने येथे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी ‘मे. टेक्नोजेम’ या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीने पुलाचे संरचनात्मक आराखडे तयार केले आहेत. मात्र, पुलाची सुरक्षितता, तांत्रिक व्यवहार्यता आणि प्रस्तावित बांधकाम पद्धती योग्य आहे का, याची स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेकडून तपासणी करण्यासाठी आयआयटी मुंबईकडून आराखड्याची फेरतपासणी करून घेण्यात येणार आहे.
४१.७७ कोटींचा अंदाजित खर्च
प्रस्तावित चुनाभट्टी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा अंदाजित खर्च सुमारे ४१.७७ कोटी रुपये आहे. यापूर्वी हा खर्च ३७.४१ कोटी रुपये इतका होता. मंजुरीच्या टप्प्यात खर्चात वाढ झाली आहे.
असा असेल उड्डाणपूल
- रेल्वे क्षेत्रातील पुलाची लांबी : ३६ मीटर
- महापालिका क्षेत्रातील पुलाची लांबी : २५४ मीटर
- रेल्वे क्षेत्रातील रुंदी : ११.३० मीटर
- महापालिका क्षेत्रातील रुंदी : ८.५ मीटर
- बांधकामाचा प्रकार : आरसीसी व लोखंडी बांधकाम
आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून आराखड्याची फेरतपासणी झाल्यानंतर पुलाच्या बांधकामाचा पुढील मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.



