मुंबई

मध्य रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम; १८ लाखांहून अधिक प्रवाशांवर धडक कारवाई

मुंबई : मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांत तब्बल १८.०३ लाख प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून मध्य रेल्वेने १४०.८१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १७.१९ लाख प्रकरणांतून १००.५० कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता.

यंदा प्रकरणांच्या संख्येत सुमारे ५ टक्के, तर दंडाच्या रकमेत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, दररोज सरासरी ११ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई होत असून सुमारे ९२.०३ लाख रुपयांची दंडवसुली होत आहे.

विभागनिहाय पाहता मुंबई विभागात सर्वाधिक ८.८० लाख प्रकरणांतून ५८.४६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. भुसावळ विभागात ३.४२ लाख प्रकरणांतून ३५.५२ कोटी, पुणे विभागात १.८६ लाख प्रकरणांतून १६.२९ कोटी, नागपूर विभागात २.११ लाख प्रकरणांतून १५.८३ कोटी आणि सोलापूर विभागात ९५ हजार प्रकरणांतून ६.१३ कोटी रुपये वसूल झाले. मुख्यालयाच्या पथकांनी ८८ हजार प्रकरणांतून ८.५७ कोटी रुपये दंड वसूल केला.

ऑगस्टमध्ये १९.५० कोटींची वसुली

ऑगस्ट २०२६ मध्ये मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी २.५७ लाख विनातिकीट किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली. ऑगस्ट २०२५ मध्ये ही संख्या २.७६ लाख होती. मात्र, यंदा दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली असून ऑगस्टमध्ये १९.५० कोटी रुपये वसूल झाले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १३.७८ कोटी रुपये दंड वसूल झाला होता. म्हणजेच दंडवसुलीत ४१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून स्थानकांवर नियमित तिकीट तपासणी, अचानक धाडी, ‘फोर्ट्रेस’ तपासणी, सखोल तपासणी तसेच मेगा तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत. मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांसह मुंबई व पुणे विभागातील उपनगरीय गाड्यांमध्येही या मोहिमा सुरू आहेत.

विनातिकीट प्रवास हा रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असून, किमान दंडाची रक्कम २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आल्यानंतर तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने प्रवाशांना गैरसोय आणि दंड टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. विनातिकीट प्रवासाबाबत रेल्वेचे धोरण ‘शून्य सहिष्णुता’ असल्याचेही मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button