मुंबई

मध्य रेल्वेची दसरा,दिवाळी आणि छट पूजेसाठी तयारी, ४१८ विशेष गाड्या गर्दीचा ताण कमी होणार?

उत्तर भारतासाठी सर्वाधिक फेऱ्या; चेन्नई, बेंगळुरू, तिरुवनंतपुरम, मडगावसाठीही विशेष गाड्या — २७ आणि २८ सप्टेंबरपासून आरक्षण

मुंबई : दसरा, दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ४१८ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर येथून उत्तर भारत, दक्षिण भारत तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. विशेष गाड्यांचे आरक्षण २७ आणि २८ सप्टेंबरपासून पीआरएस केंद्रे, संकेतस्थळ आणि ‘रेलवन’ अॅपवर सुरू होणार आहे.

मध्य रेल्वेच्या वेळापत्रकानुसार गोरखपूर मार्गावर विशेष गाड्यांच्या सर्वाधिक फेऱ्या करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–गोरखपूर दैनंदिन विशेष (०१०७९/०१०८०) १६ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान ६४ फेऱ्या करणार आहे. त्याचप्रमाणे हडपसर–गोरखपूर दैनंदिन विशेष (०१४१५/०१४१६) देखील ६४ फेऱ्या करणार आहे.

दक्षिण भारतासाठी विशेष सुविधा

दक्षिण भारतासाठी सीएसएमटी–चेन्नई साप्ताहिक वातानुकूलित विशेष (०१०१५/०१०१६) १२ फेऱ्या, सीएसएमटी–बेंगळुरू साप्ताहिक वातानुकूलित विशेष (०१०१३/०१०१४) १४ फेऱ्या करणार आहे. एलटीटी–तिरुवनंतपुरम नॉर्थ साप्ताहिक विशेष (०१४६३/०१४६४) कोकण मार्गे १२ फेऱ्या, तर एलटीटी–मडगाव साप्ताहिक विशेष (०११७९/०११८०) १४ फेऱ्या धावणार आहे.

उत्तर भारतासाठी एलटीटी–मऊ द्वि-साप्ताहिक विशेष (०११२३/०११२४), एलटीटी–बनारस द्वि-साप्ताहिक विशेष (०१०५१/०१०५२) आणि हडपसर–गाझीपूर सिटी द्वि-साप्ताहिक विशेष (०१४३१/०१४३२) प्रत्येकी २४ फेऱ्या करणार आहेत.

महाराष्ट्रातील शहरांसाठीही अतिरिक्त फेऱ्या

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सीएसएमटी–लातूर द्वि-साप्ताहिक विशेष (०११०५/०११०६) २६ फेऱ्या, सीएसएमटी–नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (०२१३९/०२१४०) १२ फेऱ्या आणि सीएसएमटी–कोल्हापूर साप्ताहिक विशेष (०१४१७/०१४१८) १२ फेऱ्या करणार आहे. पुणे–नवीन अमरावती साप्ताहिक वातानुकूलित विशेष (०१४०३/०१४०४) १२ फेऱ्या, तर नागपूर–हडपसर मार्गावरील द्वि-साप्ताहिक व साप्ताहिक विशेष मिळून ४० फेऱ्या होणार आहेत. कोल्हापूर–कलबुर्गी विशेष (०१४५१/०१४५२) आठवड्यातून पाच दिवस धावणार असून त्याच्या ६४ फेऱ्या नियोजित आहेत.

मुंबईतून सहा एकमार्गी विशेष गाड्या

सणासुदीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि सोलापूरसाठी सहा एकमार्गी विशेष गाड्याही चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी–नागपूर विशेष (०१११९) २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता, तर दुसरी नागपूर विशेष (०११०९) २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता सुटेल.

अमरावती विशेष (०११०७) २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सीएसएमटीहून रवाना होईल. सीएसएमटी–कोल्हापूर विशेष (०११११) २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस–सोलापूर विशेष (०१११५ आणि ०१११७) २७ आणि २८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता रवाना होतील.

या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा आदी प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. कोल्हापूर विशेषला पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज आणि हातकणंगले येथे थांबे असतील.

सर्व एकमार्गी विशेष गाड्यांमध्ये दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅनची संरचना असेल. सणासुदीच्या काळातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन या विशेष फेऱ्यांमुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Back to top button