मध्य रेल्वे द्वारे स्थानके आणि गाड्यांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी

मुंबई :गेल्या महिन्यात रेल्वेच्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतच्या ‘कॅग’ अहवाल आला होता त्यात अनेक रेल्वे स्टेशन वरील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे म्हंटले होते यावर रेल्वेमनात्री , श्री अश्विनी वैष्णव,यांनी र रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयाचा सविस्तर आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये त्वरित सुधारणावादी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रेल्वे बोर्डाच्या निर्देशांचे पालन करत, मध्य रेल्वेने आपल्या नेटवर्कवर पाणीपुरवठा, गाळण प्रक्रिया, चाचणी आणि देखरेख व्यवस्था बळकट करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
प्रमुख उपाययोजना
- ‘टँक-टू-टॅप’ गाळण प्रक्रिया: रेल्वे नेटवर्कवर सुमारे २०,००० ठिकाणी नवीन गाळण यंत्रणा बसवल्या जातील; यामध्ये वॉटर कूलर्स आणि पाण्याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणांचा समावेश असेल. मध्य रेल्वे द्वारे स्थानके, कोचिंग डेपो आणि प्रवाशांशी संबंधित इतर ठिकाणी या अंमलबजावणीला गती देण्यात येईल.
- पाण्याच्या टाक्या बदलणे: स्वच्छता आणि पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जुन्या व जीर्ण झालेल्या साठवण टाक्या टप्प्याटप्प्याने बदलण्यासाठी त्यांची ओळख निश्चित केली जात आहे.
- नियमित चाचणी आणि देखरेख: पाण्याचे स्रोत आणि नळ या ठिकाणी पाण्याची गुणवत्ता तपासणे, केंद्रीकृत देखरेख व जबाबदारी निश्चित करणे आणि साठवण टाक्यांची नियोजित साफसफाई व देखभाल करणे या बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.
मध्य रेल्वेने केलेली कार्यवाही
२०२३-२४ या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा येथे घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांबाबत ‘कॅग’ने केलेल्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने सर्वसमावेशक सुधारणावादी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
एका विशेष मोहिमेदरम्यान, या चारही स्थानकांवरील पाण्याच्या नमुन्यांची भौतिक, रासायनिक आणि जिवाणूविषयक चाचणी करण्यात आली. सर्व नमुने समाधानकारक आढळले असून, त्यात ‘ई-कोलाय’ किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जिवाणूजन्य संसर्ग आढळला नाही.
हाती घेण्यात आलेल्या इतर उपाययोजनांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- चारही स्थानकांवरील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये गळती आहे का, याची संपूर्ण तपासणी.
- व्हेंट्स आणि ओव्हरफ्लो यंत्रणेवर जाळीसह घट्ट झाकणे बसवणे.
- वॉटर कूलर्सची तपासणी आणि साफसफाई, तसेच त्यात साचलेला गाळ काढून टाकणे.
- गळती होणारे नळ बदलणे आणि जिथे नळ नाहीत तिथे नवीन नळ बसवणे.
- नियमित चाचणीसाठी संबंधित ‘इन्स्पेक्टर ऑफ वर्क्स’ कार्यालयांमध्ये ‘ई-कोलाय’ चाचणी किट्स उपलब्ध करून देणे.
विशेष मोहिमेअंतर्गत केलेल्या ताज्या चाचण्यांच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा येथे प्रवाशांना सध्या पुरवले जाणारे पिण्याचे पाणी सुरक्षित आणि पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले आहे. या उपाययोजनांवर रेल्वे बोर्डाच्या स्तरावर सर्वोच्च प्राधान्याने देखरेख ठेवली जात आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी प्रगती आणि पाण्याच्या गुणवत्तेचे अहवाल वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील.
हा उपक्रम म्हणजे ‘कॅग’च्या निरीक्षणांवर कार्यवाही करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधा व एकूणच प्रवासाचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेने हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेचाच एक भाग आहे.
असे मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.



