मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे या महिन्यातही हाल. ‘

मुंबई :टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामानंतर आता आसनगाव-कसारा तिसऱ्या मार्गिकेसह कसारा यार्डमधील ‘अप’ यार्ड लाइन विस्तारीकरणासाठी ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचे या महिन्यातही हाल होणार. या ब्लॉक काळात आसनगाव-कसारा दरम्यानची लोकल सेवा प्रभावित होणार तसेच लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडणाची शक्यता आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने सुरुवातीच्या ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यानच्या ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३५ ते रात्री ८.३५ वाजेपर्यंत, तर ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत कसारा-खर्डी आणि उंबरमाळी-कसारा दरम्यानच्या ‘अप’ आणि ‘डाऊन’ मुख्य मार्गिकांसह कसारा स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १, ३ आणि ४ तसेच ‘अप’ यार्डचा भाग प्रभावित होणार आहे.
ब्लॉकच्या कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकांदरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या काही लोकलचा प्रवास आसनगाव येथेच समाप्त केला जाणार आहे, तर काही सेवा रद्द किंवा वेळापत्रकात बदल करून चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यालयीन वेळेनंतर घरी परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
३७ एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम
७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान तब्बल ३७ मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात येणार असून, काही गाड्या मार्गात ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात येतील. परिणामी त्याचा परिणाम मागून येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही होण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर आसनगाव-कसारा विभागातील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, कामासाठी घेतल्या जाणाऱ्या सलग ब्लॉकमुळे सध्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.



