मुंबई

विशेष मतदार नोंदणी शिबिराचे पालिकेकडून आयोजन

मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त यांचे आवाहन

मुंबई:
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे जिल्हा) मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) – २०२६ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तथापि, प्रारुप यादीत नाव नसल्यास किंवा नोंदीबाबत आक्षेप असल्यास दिनांक ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. या अनुषंगाने, मतदारांच्या सुलभतेसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात दिनांक १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व विधानसभा मतदार संघातील पदनिर्देशित ठिकाणी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

मुंबईतील नवमतदार तसेच पात्र असून मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, मतदार यादीतील अस्तिमत्वात असलेल्या नोंदीत सुधारणा करणे तसेच यादीतील नावाची वगळणी करणे आदी बाबींवर या शिबिरात कार्यवाही केली जाईल. मुंबईतील मतदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

प्रारुप मतदार यादीत गैरहजर/स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे काही मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत. माननीय भारत निवडणूक आयोग तथा माननीय मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशांनुसार, अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणांहून मतदार यादीत नव्याने नाव अंतर्भूत करण्यासाठी दिनांक ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती सादर करता येणार आहेत.

दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव अंतर्भूत करण्याची सुविधा आता उपलब्ध झालेली आहे. या अनुषंगाने, मुंबईतील नवमतदार तसेच पात्र असून मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, मतदार यादीतील अस्तिात्वात असलेल्या नोंदीत सुधारणा करणे तसेच यादीतील नावाची वगळणी करणे, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या दावे व हरकती कालावधीत दिनांक १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व विधानसभा मतदार संघातील पदनिर्देशित ठिकाणी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

दरम्यान, नवमतदार नोंदणी किंवा प्रारुप मतदार यादीत नाव वगळले गेले असल्यास मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना (फॉर्म) क्रमांक-६, तपशीलातील दुरुस्ती दिव्यांगत्वाची नोंद किंवा स्थलांतरासाठी नमुना क्रमांक -८ तसेच मतदार यादीत नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ उपलब्ध आहेत. सदर नमुना अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून प्राप्त करता येतील. तसेच, ऑनलाईन अर्जासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा किंवा ECINET या मोबाइल अॅपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button