मुंबई

दूषित पाण्याच्या तक्रारींवर पालिका लगेच करणार निवारण,

पाणी शुद्ध होईपर्यंत दुरुस्ती सुरूच; प्रयोगशाळेच्या ‘पास’ अहवालानंतरच तक्रार बंद

मुंबई :
मुंबईत अनेक भागामध्ये विशेषतः झोपडपट्टी आणि चाळीमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.यावर पालिकेच्या जलविभागांकडून पावले उचलली जात आहेत. जलवितरण व्यवस्था अधिक प्रभावी करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी महापालिकेच्या जलअभियंता विभागाने नवी मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे. तक्रार प्राप्त झाल्यापासून प्रत्यक्ष पाहणी, गळतीचा स्रोत शोधणे, दुरुस्ती, पाण्याचे नमुने घेणे आणि प्रयोगशाळा तपासणीपर्यंतची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.

समस्या पूर्णपणे दूर होईपर्यंत दुरुस्तीची कामे २४ तास सुरू ठेवण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अविनाश बांगर यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

गटारे, नाले आणि पर्जन्य जलवाहिन्यांमधील गळती, जुन्या व गंजलेल्या जलवाहिन्या तसेच ड्रेनेज ओव्हरफ्लोमुळे जलवाहिनीत दूषित पाणी मिसळण्याची शक्यता असते. अशा तक्रारींवर जलअभियंता, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिनी, घनकचरा व्यवस्थापन आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी विभागांच्या समन्वयातून कारवाई केली जाणार आहे.असे अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले.

तक्रारीची दखल ताबडतोब

कॉल, पोर्टल, अॅप किंवा लेखी स्वरूपात तक्रार प्राप्त होताच तिची नोंद करून संबंधित वॉर्डमधील अभियंते आणि गळती शोध पथकाला सतर्क केले जाईल. त्यानंतर पुढील पाणीपुरवठ्याच्या वेळेतच घटनास्थळी पाहणी करून आवश्यकतेनुसार पाण्याचे नमुने घेतले जातील.

फ्लशिंगसह कॅमेरा तपासणी मुख्य जलवाहिनी फायर हायड्रंटद्वारे फ्लश केली जाईल. तसेच ड्रेनेज आणि पर्जन्य जलवाहिन्यांची स्वच्छता करण्यात येईल. भूमिगत गळती शोधण्यासाठी ‘साउंडिंग रॉड्स’ किंवा डिजिटल उपकरणांचा वापर केला जाईल. आवश्यकतेनुसार जलवाहिनीत कॅमेरा सोडून दूषित पाण्याचा स्रोत शोधला जाईल आणि गळतीची दुरुस्ती केली जाईल.

‘पास’ अहवालानंतरच तक्रार बंद

दुरुस्ती झाल्यानंतरही पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातील. पाणी पिण्यायोग्य असल्याचा ‘पास’ अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नागरिक आणि लोकप्रतिनिधींना त्याची माहिती दिली जाईल. त्यानंतर संबंधित परिसर सात दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. नागरिकांचे समाधान झाल्यानंतरच तक्रार अधिकृतपणे बंद केली जाणार आहे.

Related Articles

Back to top button