मुंबई

गणेशोत्सवातील उत्कृष्टतेचा ‘श्रीगणेश गौरव’ स्वप्नाक्षय मित्र मंडळाला

भटवाडीचा राजा द्वितीय, पंचगंगा मंडळ तृतीय; कांजूरमार्गच्या शिवशक्ती मंडळाला सर्वोत्कृष्ट शाडू मातीच्या मूर्तीचा पुरस्कार

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२६’मध्ये अंधेरी पश्चिम येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.

मंडळाला ७५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

घाटकोपर पश्चिम येथील अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘भटवाडीचा राजा’ला द्वितीय,

तर करीरोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

महापालिका मुख्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पर्धेच्या निकालाची घोषणा केली.

यंदाच्या स्पर्धेत ५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ आणि १८ सप्टेंबर रोजी, तर अंतिम फेरी १९ आणि २० सप्टेंबर रोजी घेण्यात आली. देखाव्याचा विषय, पर्यावरणपूरक मूर्ती, सामाजिक उपक्रम, परिसर स्वच्छता, जनहित संदेश, पर्यावरणपूरकता तसेच महापालिकेच्या विविध मोहिमांमधील सहभाग या निकषांवर मंडळांचे परीक्षण करण्यात आले.

कांजूरमार्ग पूर्व येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सर्वोत्कृष्ट शाडू मातीच्या श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचा पुरस्कार विलेपार्ले पूर्व येथील बाळ गोपाळ मित्र मंडळाच्या ‘मुंबईचा पेशवा’ या गणेशमूर्तीसाठी श्री. मयेकर यांना, तर सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचा पुरस्कार बोरिवली पूर्व येथील ‘चंपाभुवनचा विघ्नहर्ता’च्या सजावटीसाठी रेश्मा शिंदे यांना मिळाला.

अवयवदान जनजागृतीसाठी विक्रोळी पश्चिम येथील बालमित्र कला मंडळाला, तर पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी दहिसर पूर्वेतील श्री श्रद्धा मित्र मंडळ ट्रस्ट आणि दादर पश्चिमेतील शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पारितोषिके जाहीर झाली आहेत. गोरेगाव पश्चिमेतील बेस्ट नगर श्रीगणेशोत्सव मंडळ आणि मालवणी-मालाड पश्चिमेतील युवक उत्कर्ष मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली आहेत.

यंदाची ही स्पर्धा ३७व्या वर्षात असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरी सेवा-सुविधा, पर्यावरण आणि जनहिताचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. याशिवाय विविध सामाजिक, पर्यावरणीय आणि जनजागृतीपर उपक्रमांसाठी १४ गणेशोत्सव मंडळांना विशेष प्रशस्तीपत्रे जाहीर करण्यात आली आहेत.

Related Articles

Back to top button