मनपा शाळांतील १.२७ लाख विद्यार्थ्यांनी साकारला ‘विकसित भारत’

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत १,०४३ शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेला मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबईतील १,०४३ मनपा शाळांमधील तब्बल १ लाख २७ हजार ५६९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत ‘विकसित भारत’ आणि सेवाकार्यांवर आपल्या कल्पनाशक्तीचे रंग भरले.
मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून २२ सप्टेंबर रोजी मनपा शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी-सहावी, सातवी-आठवी आणि नववी-दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली.
‘विकसित भारत’ तसेच ‘पंतप्रधान महोदयांनी केलेली सेवाकार्ये’ हे स्पर्धेचे विषय होते. सुरुवातीला ९२४ शाळांमधील १ लाख १० हजार २०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी सहभागाचा आकडा १ लाख २७ हजार ५६९ वर पोहोचला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
जी-दक्षिण विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी शाळा, ई-विभागातील एमपीएस न्यू भायखळा इंग्रजी शाळा आणि एफ-उत्तर विभागातील नाडकर्णी पार्क मनपा शाळा संकुल, वडाळा यांसह विविध शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळाला. लोकप्रतिनिधी तसेच मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी केली आणि त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी प्रत्येक शाळेच्या सभागृहात किंवा व्हरांड्यात विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी विद्यार्थी आणि पालकांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रत्येक शाळेत तीनही गटांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि पाच उत्तेजनार्थ अशी प्रत्येकी आठ उत्कृष्ट चित्रे निवडण्यात येणार असून, प्रत्येक शाळेतील एकूण २४ कलाकृतींचा गौरव केला जाणार आहे.
महापौर रितू तावडे, आमदार अतुल भातखळकर, आमदार ॲड. पराग आळवणी, शिक्षण समिती सभापती राजश्री शिरवडकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच शिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरतकुडवे आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



