मुंबई

BMC – महापालिका शाळांच्या दैनंदिन पुस्तिकेतून डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र वगळल्याचा आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदा वितरित करण्यात आलेल्या दैनंदिन पुस्तिकेत (स्कूल डायरी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. हे छायाचित्र वगळण्यात आल्याचे कारण स्पष्ट करून या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी केली आहे.

यासंदर्भात पेडणेकर यांनी बुधवारी (३० सप्टेंबर) शिष्टमंडळासह महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या दैनंदिन पुस्तिकेत विविध महत्त्वपूर्ण माहिती आणि मूल्यांची ओळख करून दिली जाते. त्यामुळे पुस्तिकेतील मजकूर तसेच छायाचित्रांची छपाईपूर्वी योग्य पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे, या विचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. अशा महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे छायाचित्र दैनंदिन पुस्तिकेतून वगळले जाणे ही गंभीर बाब असल्याचे पेडणेकर यांनी नमूद केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

“छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहेत. विद्यार्थ्यांना वितरित होणाऱ्या दैनंदिन पुस्तिकेत अशा महान व्यक्तिमत्त्वांचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे. हा शिष्टाचार शिक्षण विभाग कसा काय विसरला?” असा सवाल पेडणेकर यांनी केला.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेली दैनंदिन पुस्तिका नव्याने छापण्यात यावी आणि सध्या वितरित करण्यात आलेल्या पुस्तिका रद्द करून दुरुस्ती केलेल्या पुस्तिका विद्यार्थ्यांना पुन्हा वितरित कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button