मुंबई

१४ फुटांवरील झोपड्यांना नोटिसा देण्यास स्थगिती द्या

गणेश खणकर यांची महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी; सरसकट कारवाई न करण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई शहरातील झोपडपट्टी क्षेत्रातील १४ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांना नोटिसा देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याचा दावा महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश खणकर यांनी केला आहे. या कारवाईमुळे झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या नोटिसांना तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी खणकर यांनी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबईतील सुमारे ४० टक्के लोक झोपडपट्टी क्षेत्रात राहत असल्याचा दावा खणकर यांनी आपल्या पत्रात केला आहे. महाराष्ट्र शासनाकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) माध्यमातून तसेच क्लस्टर आणि अन्य योजनांद्वारे झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचेही खणकर यांनी म्हटले आहे.

अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना केवळ बांधकामाच्या उंचीच्या निकषावरून त्रास होईल, अशी कारवाई महापालिकेने करू नये, अशी भूमिका खणकर यांनी मांडली आहे. प्रशासनाने १४ फुटांवरील झोपड्यांना नोटिसा देण्याच्या सूचना दिल्या असतील, तर त्या तातडीने मागे घ्याव्यात किंवा त्यांना स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, ज्या झोपडपट्टीतील बांधकामांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा धोकादायक बांधकामांवरच नियमानुसार कारवाई करावी, असे खणकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सर्व झोपड्यांना सरसकट नोटिसा देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सरसकट नोटिसा बजावून कारवाई केल्यास मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो आणि त्याचा फटका गरीब मुंबईकरांना सहन करावा लागू शकतो, असा इशाराही खणकर यांनी आपल्या पत्रातून दिला आहे.

Related Articles

Back to top button