मुंबई

BMCच्या 390 कनिष्ठ अभियंता पदांचा मार्ग मोकळा

मुंबई :मुंबई महापालिकेतील (BMC) सुमारे 390 कनिष्ठ अभियंता (JE) पदांची रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी डिप्लोमा हीच निर्धारित पात्रता असल्याचे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने पदवीधर उमेदवारांनी दाखल केलेली याचिका फेटाळली. त्यामुळे 2024 पासून रखडलेल्या भरती प्रक्रियेवरील कायदेशीर अडथळा दूर झाला असून, महापालिकेला भरती प्रक्रिया पुढे नेण्याची मुभा मिळाली आहे.

महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीसाठी डिप्लोमा पात्रता निश्चित केली होती. मात्र, केवळ डिप्लोमा उमेदवारांनाच या पदांसाठी पात्र ठरविण्याच्या निर्णयाला काही पदवीधर उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. अभियांत्रिकीची पदवी असलेल्या उमेदवारांनाही कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र ठरवावे, अशी त्यांची मागणी होती. या याचिकेमुळे भरती प्रक्रिया रखडली होती.

या प्रकरणात उच्च न्यायालयाने महापालिकेच्या पदासाठी निश्चित करण्यात आलेल्या पात्रतेचा विचार करत, कनिष्ठ अभियंता पदासाठी केवळ अभियांत्रिकीची पदवी असल्याने उमेदवार पात्र ठरू शकत नाही, असे स्पष्ट केले. संबंधित पदासाठी जाहीर करण्यात आलेली डिप्लोमा पात्रता ग्राह्य धरत पदवीधर उमेदवारांची याचिका न्यायालयाने फेटाळली.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे सुमारे 390 कनिष्ठ अभियंता पदांची भरती प्रक्रिया पुढे नेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता महापालिका प्रशासनाकडून भरतीची पुढील प्रक्रिया तातडीने सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 2024 मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी डिप्लोमा ही पात्रता ठेवण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेल्याने भरती प्रक्रियेवर परिणाम झाला होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हा अडथळा दूर झाल्याने इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता महापालिकेच्या पुढील भरती कार्यक्रमाकडे लागले आहे.

Related Articles

Back to top button