मुंबई

गणेशोत्सवात २७५५ मेट्रिक टन विसर्जनोत्तर साहित्याचे संकलन

अनंत चतुर्दशीला ५१० मेट्रिक टन साहित्याची वाहतूक; पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची अविरत सेवा

मुंबई : गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशमूर्ती विसर्जनानंतर निर्माण झालेले मूर्ती साहित्य आणि निर्माल्य संकलित करण्याची व्यापक मोहीम मुंबई महापालिकेने राबविली. १६ ते २७ सप्टेंबरदरम्यान महापालिकेने तब्बल २ हजार ७५४.८५ मेट्रिक टन विसर्जनोत्तर मूर्ती साहित्याचे संकलन केले. हे साहित्य निर्धारित तात्पुरत्या साठवणूक केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी ७०७ वाहन फेऱ्या करण्यात आल्या.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी, २६ सप्टेंबर रोजी विसर्जनोत्तर साहित्याची सर्वाधिक वाहतूक झाली. या दिवशी १३१ वाहन फेऱ्यांद्वारे ५१०.९२ मेट्रिक टन निर्माल्य आणि मूर्ती साहित्य संकलित करून त्याची वाहतूक करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांसह केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शिफारशींचे पालन करत पीओपीच्या मूर्तींचे अवशेष जलस्रोतांमध्ये कायमस्वरूपी राहू नयेत, यासाठी महापालिकेने विशेष व्यवस्था केली होती. पीओपी पाण्यात सहज विरघळत नसल्याने त्याचे संकलन करून तात्पुरत्या साठवणुकीनंतर पुढील वैज्ञानिक प्रक्रियेसाठी पाठविण्यात येत आहे.

महापालिकेच्या विभागनिहाय पथकांनी विसर्जित मूर्ती आणि त्यांचे अवशेष संकलित केले. या साहित्याच्या वाहतुकीसाठी स्वच्छ आणि झाकलेल्या वाहनांचा वापर करण्यात आला. प्रत्येक वाहनाचे वजन करून त्याची नोंद ठेवण्यात आली. तसेच संकलन प्रक्रियेची छायाचित्रे, व्हिडिओ आणि दैनंदिन प्रगती अहवालही जतन करण्यात आले.

परिमंडळनिहाय संकलनात के-पश्चिम विभागातून ३१४.८२ मेट्रिक टन, एस विभागातून २५३.५८ मेट्रिक टन आणि डी विभागातून २४९.४३ मेट्रिक टन साहित्याचा समावेश आहे.

संकलित मूर्ती साहित्य मुलुंड येथील निर्धारित तात्पुरत्या साठवणूक केंद्रात आणण्यात आले आहे. पुढील टप्प्यात या साहित्याचे वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पुनर्वापर, पुनर्चक्रण अथवा पुनर्प्रक्रिया करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या संपूर्ण मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा बजावत विसर्जनानंतरच्या स्वच्छता व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Related Articles

Back to top button